अनेकींना आपल्या दिसण्याबद्दल फार न्यूनगंड असतो. म्हणजे मी फारच बारीक दिसते, किंवा वजन वाढलंय तर जीन्स कशी घालू?
असे अनेक प्रश्न अनेकींना सतावत असतात. फॅशन करायची म्हटलं की मोठं टेन्शनच येतं या पोरींना. पण मुळात स्वतःबद्दल हा न्यूनगंड हवाच कशाला? मैत्रिणींनो फॅशन आपल्यासाठी आहे, आपण फॅशनसाठी नाही.
आपण आपल्याला शोभेल अशी किंबहुना आवडेल किंवा कम्फर्टेबल वाटेल अशी फॅशन करावी, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण आपण नेमकं तेच विसरुन जातो. जगभरातले सगळे फॅशन डिझायनर्स हेच सांगतात, वीअर युअर फॅशन.. तुम्ही कराल, ती तुमची फॅशन असते. ती छान कॅरी करा. स्वतःबद्दल कमीपणा बाळगू नका.
मी हे घातल्यावर कशी दिसेन? त्यात जाडी तर वाटणार नाही ना? हा रंग मला बरा दिसेल का? तो दागिना माझ्यावर खुलेल का? या सगळ्या गोष्टी म्हणजे आपणच तयार केलेले विविध बागुलबुवा आहेत.
जाडेपण हे शरीरापेक्षा जास्त मनात असतं. मैत्रिणींनो, काही कपड्यांत तर झिरो साइझवाली करिनाही जाडी दिसतेच की. मग आपण कशाला इतकं वाईट वाटून घ्यावं? स्त्रियांना सतावणारा दुसरा प्रश्न म्हणजे, 'मी घातलेले कपडे फॅशनला धरून असतील का?' पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. फॅशन आपल्यासाठी आहे. आपण फॅशनसाठी नाही. उदा. एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगला जायचं असेल आणि ट्राऊजर, शर्ट, स्कर्ट घालायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही उत्तम भारतीय पंजाबीही घालून जाऊ शकता.
कोणताही रंग असो वा नक्षी ती फॅशनमध्ये आहे का, यापेक्षा ती आपल्याला आवडलीय ना याचा विचार करा.
एखाद्या जीन्समध्ये भले तुम्ही जाड दिसत असाल पण ती तुम्हाला आवडत असेल तर ती घालाच. कारण ती घातल्यानंतरच्या समाधानापुढे तुमचा जाडेपणा फिका आहे.
फॅशनच्या नावाखाली ज्यात फार घट्टमुट्ट वाटणाऱ्या कपड्यांत स्वतःला कोंबण्यापेक्षा कम्फर्टेबल कपड्यांत हसतमुख राहा. कारण फॅशन आपण आपली बनवायची असते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट