टीव्ही मालिकांच्या विषयावर मेल्सचा पाऊस पडला. मालिकेतल्या सोशीक नायिकांवर वैतागणाऱ्या वाचकांनी समंजस व्यक्तिरेखांचीही वाहव्वा केलीय. मालिकेतलं नाट्य हे नुसतंच भव्यदिव्य नव्हे तर सामान्य प्रेक्षकाला भावणारं हवं असतं, हेच वाचकांचं मत आहे.
टीव्हीसोबतचं महिलाचं नातं फार जुनं आहे. म्हणजे मालिकांचा हक्काचा प्रेक्षक हा घरातली बाईच होती. पण बदलत्या काळानुसार घरची स्त्रीही बदलली. ती घरातून बाहेर पडू लागली. अधिक आत्मविश्वासाने वावरु लागली. त्यातूनही टीव्ही पाहण्यासाठी ती आजही वेळ काढते. पण टीव्ही तिला नेमकं काय देतो? स्त्रीप्रधान म्हणून मिरवणाऱ्या मालिकांतली स्त्री खरोखरच त्या घरातील 'प्रधान व्यक्ती' आहे का?
यंदाच्या २६ जानेवारीच्या परेडमध्ये सहभागी झालेल्या एका पुरस्कार प्राप्त महिला अधिकाऱ्याने सांगितलं, 'दूरदर्शनवरच्या 'आरोहण' या मालिकेतल्या पल्लवी जोशीने साकारलेली नेव्ही ऑफिसर पाहून मला देशाच्या लष्करात जाण्याची प्रेरणा मिळाली.' असा अनुभव आजच्या कोणत्या मुलीला येत असेल का? मराठीत डेलीसोपचं वेड आणलं, 'दामिनी' आणि आभाळमायासारख्या मालिकांनी. यानंतर वादळवाटसारखी मालिकाही गाजली. यांचं वैशिष्ट्यं म्हणजे या मालिकांमध्ये महिला मध्यवर्ती भूमिकेत होत्याच. पण त्या अबला, रडक्या नव्हत्या. त्यांनी घरोघरच्या बायकांना आत्मविश्वास दिला. हे सगळं चालू असताना अचानक मात्र छोट्या पडद्यावर बदलाचं वादळच आलं. खंबीर, कर्तबगार नायिका अचानक सोशीक, दुबळ्या होऊन गेल्या. घराबाहेर पडून स्वावलंबी होण्यापेक्षा महिला घरातच राहून कट-कारस्थानात राहू लागल्या. स्वयंपाकघरातल्या भांडणातच कर्तब मानू लागल्या. याचं कारण शोधताना एका टीव्ही तज्ज्ञांनी सांगितलं, 'अशा सोशीक स्त्रयिांची लाट हिंदीत जोरात होती. मग एक प्रयोग म्हणून मराठीतही ती आणली गेली. तेव्हा ती यशस्वीही ठरली. पण नंतर हळूहळू चित्र पुन्हा बदलत गेलं. एखादा संदेश देणाऱ्या किंवा सकारात्मक विचार रुजवू बघणाऱ्या मालिकांकडे प्रेक्षकांचा कल जास्त असल्याचं लक्षात आलं. मग तशा पद्धतीच्या मालिका बनू लागल्या.'
तरीही आत्ताचं चित्र आणखीच वेगळं दिसतं. अनेकदा कथानक संपल्यासारखं वाटेपर्यंत पाणी घातलं जातं. मग त्याला ट्विस्ट अँड टर्नस असं गोंडस नावही दिलं जातं. दिया और बाती, अस्मिता, दुर्वा, एअरलाइन्स, एव्हरेस्ट, जुळून येती रेशीमगाठी... सारख्या मालिकांमधून अशाप्रकारचे प्रयत्न होतानाही दिसतायत. पण प्रेक्षकांचा आक्षेप आहे तो यातल्या उगाच जोडलेल्या उपकथानकांना. मालिकांनी लांबड लावू नये आणि 'थोड्यात गोडी'हे वाक्यं चॅनल्सनी खरोखरच समजून घ्यावं, इतकीच आयाबायांची इच्छा आहे!!!
आदिती जवळची वाटते
डॉक्टर असल्याने मला टीव्ही पाहायला फारसा वेळ मिळत नाही. तरीही थोडासा वेळ मी मालिका बघते. मला 'का रे दुरावा'मधल्या आदितीचं पात्र भावतं. श्रीमंत घरची एकुलती एक मुलगी असून आपलं प्रेम आहे त्याच्याशी लग्न करणारी आणि त्याला मोठं होण्यासाठी मदत करणारी अदिती आपल्यातलीच एक कुणीतरी आहे असं वाटतं. याशिवाय वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेली 'एव्हरेस्ट'मधली अंजलीही मला आवडते. अशा स्त्रीशक्तीची जाणीव करून देणाऱ्या मालिका मला आवडतात. मालिकांतील मुख्य स्त्री पात्राच्या लढ्याचा समाजावर सकारात्मक परिणाम होतो.
- डॉ. सोनाली परळीकर, कल्याण
इंग्रजी मालिकाच पाहते
आपल्याकडच्या मालिकांमधला तोचतोचपणा कंटाळवाणा वाटतो. सध्या सगळीकडे विभक्त कुटुंब पद्धती दिसते. पण मालिकांत एकत्र कुटुंबपद्धतीचाच उदोउदो होतो. त्यांच्याशी आम्ही तरुणाई रिलेट करू शकत नाही. त्यापेक्षा मी इंग्रजी मालिका बघते. स्त्री स्वातंत्र्य, बायकांचं उत्तम करिअर, पुरुषांच्या बरोबरीने त्यांना मिळणारा वाव, कॉमेडी, थ्रिलर, रोमान्स अशा सगळ्याच प्रकारांत प्रमुख भूमिकेत आत्मविश्वासाने वावरणाऱ्या स्त्रयिा मला आवडतात. फ्रेंड्स या मालिकेतल्या मोनिका आणि फिबी या दोन्ही व्यक्तिरेखा मला खूप आवडतात. त्या माझ्या मैत्रिणीच आहेत असं वाटतं. ती मालिका बंद होऊन ११ वर्षं झाली तरी आजही त्यांची पात्रं लक्षात राहतात.
- नेहा खरे, पनवेल
चित्र बदलायला हवं
मालिकांमध्ये कायम शहरांतल्या बायका सुधारलेल्या आणि खेड्यातल्या मात्र मागासलेल्याच असं चित्र दाखवलं जातं. ते बदलायला हवं. आधुनिकता आणि पारंपरिकत याची सांगड मालिकेत असावी. मला 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधली नायिका आवडते. स्वतःमध्ये बदल करून घेण्यासाठी सदैव तयार असलेला तिचा स्वभाव मला आवडतो.
- नंदा कामत, अलिबाग
सर्वगुणसंपन्नतेचा आव
मालिका स्त्रीप्रधान नक्कीच आहेत. पण त्यातली नायिका अगदी सर्वगुणसंपन्न दाखवली जाते. ते काही पचनी पडत नाही. तिच्या अतीचांगुलपणाचं उगाचच उदात्तीकरण करणं आवडत नाही. आम्हा सामान्य प्रेक्षकांना पडणारे प्रश्न नायिकांच्या अत्यंत हुशार आणि उद्योगपती असलेल्या नवऱ्यांना का पडत नाहीत? नोकरीच्या शोधात असलेल्या किंवा बेकार पतीसोबत राहणाऱ्या नायिकेचं अत्यंत टापटिप राहणं आणि स्ट्रेटनिंग केलेले केस पाहून, यासाठी पैसा कुठून आला? असा प्रश्न पडतो. अर्थात काही मालिकांत सासू-सुन-नणंद-जावा यांच्यात खूप सामंजस्याचं वातावरण दिसतं. ते पाहून खूप बरं वाटतं.
- अदिती तवटे, कळवा
खोटारड्या
घरातल्या नवीन बाळाचं नाव काय ठेवायचं इथपासून सवतीला घराबाहेर कसं काढायचं इथपर्यंत सगळे निर्णय मालिकांतल्या स्त्रयिाच घेताना दिसतात. पण इतक्या सामर्थ्यशाली असलेल्या या बायका मेकअपचे थर चढवून फालतू कट-कारस्थान का करत राहतात, हे देवच जाणे, नव्हे दिग्दर्शकच जाणे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या स्त्रयिा हे सगळं रिलेट करू शकत नाही, कारण आजच्या स्त्रीकडे मान आहे, स्वतः कमावलेला पैसाही आहे पण कट कारस्थानांसाठी लागणारा रिकामा वेळ मात्र त्यांच्याकडे नाही. त्यामुळे या मालिका खोट्या वाटतात. 'एव्हरेस्ट' आणि 'दिया और बाती हम'सारख्या मालिकांतून खरोखरच स्त्रीशक्तीचं दर्शन घडतं. त्या मालिका नक्कीच प्रेरणादायी आहेत.
- नमिता धुरी, बोरीवली
स्त्री-पुरुष समानतेचा संदेश
आजच्या बऱ्याच मालिका कुटुंबातील महिलांनाही समान स्थान देताना दिसतात. सध्याची 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका स्त्री-पुरुष समानता दाखवण्यात यशस्वी झाल्याचं मला वाटतं. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'सारख्या मालिकेतही कुटुंबातील स्त्रयिांचं स्थान महत्त्वाचं दाखवलेलं आहे. घरातल्या निर्णयात घरच्या बाईला सहभागी करून घेतलंच पाहीजे असा संदेश या मालिका देतात. हे जास्तीतजास्त लोकांनी पाहिलं आणि स्वीकारलं तर फार उपयोगी ठरेल.
- आसावरी जोशी, पुणे
डोकेदुखी
मी विरंगुळा म्हणून मालिका बघते पण काही मालिका मात्र खरोखरच डोकेदुखी असल्यासारख्या वाटतात. उदा. 'होणार सून मी ह्या घरची'. ही मालिका आधी खूप छान आणि आपलीशी वाटत होती. श्री आणि जान्हवीचं बस स्टॉपवरचं प्रेम, त्यांच्या लग्नाची कथा खूप गोड होती. ज्यावेळी सर्व सासवांनी जान्हवीला स्वीकारलं तेव्हाच ही मालिका बंद व्हायला हवी होती. पण तिची स्मृती जाणं-येणं, श्रीच्या तोंडाला काळं फासणं... असल्या गोष्टी पाहून वैताग आलाय. हे सगळं भयंकर खोटं वाटतं. इतक्या मोठ्या कंपनाचा मालक असलेला श्री ते काळं वगैरे फासून झाल्यावर सगळं करतो. आधी काहीच का करत नाही? असा प्रश्न पडतो. जान्हवीच्या आईवर सगळे का विश्वास ठेवतात, याचं उत्तर तर शेवटपर्यंत मिळत नाही. मालिकेचे दिग्दर्शक आम्हा प्रेक्षकांना मूर्ख समजतात म्हणून अशा प्रकारे मालिका बनवतात का?
- स्वप्ना नांदावडेकर, अंधेरी
अंजलीची जिद्द आवडते
कटकारस्थानी मालिका मला फार बोअर होतात. 'एव्हरेस्ट' ही मालिका मात्र मला आवडतेय. एकतर मालिकेचा विषय खूपच वेगळा आहे. त्यातील अंजली ही नायिका वडिलांचा विरोध असून आणि इतरही अनेक अडचणी असूनही त्यावर मात करत एव्हरेस्ट सर करते. त्यामुळे अंजली ही गिर्यारोहण क्षेत्रातील महिलांसाठी किंवा इतर क्षेत्रातील महिलांसाठीही खूपच प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे.
- सोनाली जोशी, माझगाव
समानता दिसायला हवी
मला सासू-सुनांच्या मालिकांऐवजी संघर्ष करणाऱ्या कर्तबगार महिलांच्या मालिका जास्त आवडतात. सध्या मी 'साड्डा हक्क' ही मालिका बघते. त्यातली संयुक्त मला फार आवडते. शिक्षणाचा ध्यास आणि त्यासाठी तिचा संघर्ष प्रेरणा देऊन जातो. आज आपल्याकडे सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा अशा प्रकारच्या मालिकांची गरज आहे. स्त्रियांचं महत्व, स्त्रीपुरुष समानता, सामाजिक विषयातलं त्यांचं योगदान या गोष्टी मालिकेतून दिसायला हव्यात.
- भाग्यश्री वाळिंबे, वाशी
'दुर्वा'कडून प्रेरणा मिळते
मालिका ही आमची सवय झाली आहे. त्या कितीही नाही आवडल्या तरी सवयीने बघितल्या जातातच. उदा. 'होणार सून मी...' मालिका. सुरुवातीला बरी वाटली पण इतक्या समंजस बायका अचानक अशा कशा वागायला लागल्या? हे अजिबात समजत नाही. त्यापेक्षा मला 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतली नाना-माईंची रेशीमगाठ अधिक सुखद वाटते. तर 'दुर्वा' या मालिकेतली सारासार विचार करणारी तडफदार दुर्वा मला आवडते. तिच्यासारखी तडफ आपल्याही मुलींमध्ये असावी, असं वाटतं.
- वैदेही आठल्ये, ठाणे
संकलन - आकांक्षा मारुलकर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट