मुलगा-मुलगी असा भेद न करता सरनोबत दाम्पत्याने २१ वर्षांपूर्वी आपल्या मुलीचे संगोपन करताना तिच्यावर या अनिष्ट प्रथेची सावली पडणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेतली. मुलीला तिच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी देण्याबरोबरच तिला सर्व त्या सुविधा पुरवण्याचा जीवापाड प्रयत्न केला. याचेच फळ म्हणजे 'गोल्डन गर्ल' राही सरनोबतचा दुधाळी पॅव्हेलियन ते कॉमनवेल्थचा रोमांचकारी आणि प्रेरणादायी प्रवास. कुटुंबाच्या या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळेच राही सरनोबत घडली. घरच्यांच्या या समर्थ पाठिंब्यामुळेच समाजातील आजूबाजूची कठोर बंधणे सैल होत गेली आणि नेमबाजीतील एकाहून एक सरस शिखरे राहीने सर केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी नेमबाज म्हणून नावलौकिक मिळवत असताना राहीने उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. देदीप्यमान कारकीर्द घडवताना राहीने आपल्यावरील विश्वासाला तडा जाणार नाही, याची सर्वोतोपरी काळजी घेतली.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील सरनोबत कुटुंब व्यवसायानिमित्त येथील राजारामपुरी येथे वास्तव्यास आले. एकत्र कुटुंबातील दोन भावांसह एकुलती एक मुलगी. यामुळे दोन भावांना जे-जे मिळत होते, ते राहीलाही आपसूक मिळत गेले. शालेय वयात एनसीसीमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या राहीला नेमबाजीसाठी दुधाळी येथील शुटिंग रेंजमध्ये दाखल केले. राहीनेही कुटुंबाचा विश्वास सार्थ ठरवताना विविध स्पर्धांत आपला ठसा उमटवू लागली. राहीची शूटिंगमधील आवड आणि यशस्वी होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून तिला आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या. सुखसुविधा पायाशी लोळण घेत असताना यशस्वी होणे हे मोठे आव्हान असते. कारण अशा परिस्थितीत ध्येय हरवण्याचा धोका मोठा असतो. पण, राहीने या सुविधांचा योग्य तो वापर करत आपल्या कुटुंबाचा विश्वास सार्थ ठरवत देदिप्यमान यश मिळवले. स्पर्धात्मक जीवनात तिला अनेक अडचणीवर मात करावी लागली. मानसिक आणि शारीरिक कणखरतेच्या स्पर्धेत तिला अनेक स्पर्धकांबरोबर झुंजावे लागले. अशा जीवघेण्या स्पर्धेतूनच राही घडली. केवळ नेमबाज म्हणून यशस्वी न होता उपजिल्हाधिकारी पदापर्यंतचा तिचा हा प्रवास संघर्षावर जिद्दीने मात करण्याचा आदर्श वस्तुपाठच म्हणावा लागेल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट