फेट्यांनी फॅशनविश्व काबीज केलंय. आता गुढीपाडव्याच्या मिरवणुकीतच पाहा ना! फेटे घालून मिरवणाऱ्या अनेक फॅशनेबल मुली दिसतील. या फेट्यांमध्ये निरनिराळे प्रकारसुद्धा आलेत बरं का!
फेटा ही काही फक्त पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. आता अनेक मुलीसुद्धा फेटे घालून मिरवताना दिसून येतात. अगदी कॉलेजची पार्टी ते घरगुती सणसमारंभापर्यंत आणि स्वागतयात्रेपासून ते बाइक रॅलीपर्यंत सगळीकडे आवर्जून स्टायलिश फेटे घालण्याची क्रेझ मुलींमध्ये वाढतेय. फेट्यांचे व्यावसायिक मधुकर औंधकर यांच्या मते दरवर्षी फेटा खरेदी करणाऱ्या मुलींची संख्या वाढतेय. पारंपारिक फेट्याला खास आधुनिक टच देऊन आपल्याला हवे तसे फेटे बनवण्याकडे त्यांचा अधिक कल असल्याचं दिसून येतंय.
कोणत्या फेट्याची आहे क्रेझ??
पुणेरी फेटा :- पाच-साडेपाच मीटर कपड्यात बांधला जाऊ शकणाऱ्या या फेट्याला त्याच्या हलकेपणामुळे आणि साध्या रंगसंगतीमुळे बायकांची प्रथम पसंती आहे. छोटासा तुरा आणि छोटा सोगा यामुळे तो मुलींना अधिक शोभून दिसतो आणि कॅरी करायलाही सोप्पा पडतो.
कोल्हापुरी फेटा:- मर्दानी लूक हवा असेल तर कोल्हापुरी फेट्याला पर्याय नाही. याच्या भरगच्च तुऱ्यामुळे आणि बांधणीसारख्या रंगसंगतीमुळे एक वेगळीच ऐट फेटा बांधल्यावर तुम्हाला जाणवेल. फेट्याचा लांबलचक सोगा एका खांद्यावरून पुढे घेऊन दुसऱ्या खांद्यावर मागे टाकून एक वेगळा लूक तुम्ही स्वतःला देऊ शकता.
जय मल्हार पगडी:- बिना तुऱ्याचा बिन सोग्याचा हा फेटा काहीसा पगडीसारखा दिसतो. 'जय मल्हार' मालिकेतील खंडोबाच्या स्टाइलची लालबुंद पगडी आणि लहान मुलींसाठी बालगणेशस्टाइल छोटी पगडी यांचा एक ट्रेंड या वर्षी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय. मात्र या फेट्यांची किंमत २५०० पासून ते ३५०० पर्यंत आहे.
स्वामीनारायण फेटा: मोहक अबोली रंगातला फेट्याचा हा प्रकार सध्या चांगलाच चर्चेत आहे. पगडीसारखा यालाही तुरा व सोगा नसतो मात्र इतर फेट्यांपेक्षा याचा आकार मोठा असल्यामुळे हा कोल्हापुरी फेट्यासारखा भरगच्च दिसतो.
फेटा घालून झक्कास दिसण्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत, फॅशन डिझायनर पूर्णिमा ओक यांनी. साडीचा फेटा: रेशमी भरजरी साडीचा फेटा बांधून नेहमीच्या लाल, पिवळ्या किंवा केशरी फेट्यापेक्षा एक वेगळा लूक तुम्हाला देत येईल. मात्र असं करताना पदराचा जरीचा भाग तुऱ्याच्या जागी यायला हवा. दोन रंगांचा हा फेटा आणि त्याची जरीची बॉर्डर पारंपारिक नउवारीवर उठून दिसेल यात शंका नाही.
फेट्याला सजवा अलंकारांनी :- पारंपारिक फेट्याला हटके रूप द्यायचं असेल तर तुऱ्यापासून ते कानशिलावरील पट्टीपर्यंत मोत्याची माळ किंवा बोरमाळ लावून तुम्ही त्याला एक चमको लूक देऊ शकता. मधल्या कलगीऐवजी सुंदर झुमके किंवा लटकन लावून एक फेस्टिव्ह किंवा सेलिब्रेशन लूक फेट्याला देता येईल.
वेस्टर्न टच: पारंपारिक पोशाख सांभाळायला जमत नाही पण तरीही फेटा घालायचाय तर मग हा पर्याय ट्राय करायलाच हवा. गडद रंगाच्या स्ट्रेटकट वनपीसवर तुम्ही हलक्या फिकट रंगाचा किंवा विरुद्ध गडद रंगाचा फेटा वापरू शकता. फेट्याच्या मध्यभागी एखादा ब्रोच लावून आलेला एक रीच लुकही मिळवता येईल.
पेहेरावात फ्युजन : पटियाला किंवा धोती सलवार, शॉर्ट कुर्ता त्यावर जरीचं जॅकेट आणि डोक्याला भगवा किंवा लाल फेटा यामुळे तुम्ही हटके दिसाल यात शंकाच नाही. पेशवाई पद्धतीचा कुर्ता-सुरवार आणि त्यावर बोरमाळा किंवा घुंगरू आणि चेन लावून सजवलेली आडवी पगडी हाही एक आगळा लूक ठरू शकेल..
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट