कोकणात शिमग्याची मजा काही वेगळीच असते. त्यामुळेच ऑफिसांमध्ये सुट्ट्या टाकून तरुण चाकरमानी या शिमग्याला आवर्जून हजेरी लावतात.
-ए होळीच्या आदल्या रात्री निघतोय हा मी!
-पण तुझा तो खडूस बॉस...?
-दांडी मारीन रे मी... अचानक आजारी पडलो. शिमग्याला तर जायला पाहिजे ना राव... बॉस-बिस काय राहणारच कटकट करत..
कटकटा बॉस असो किंवा कंटाळवाणं काम.. कोकण पट्ट्यातली तरुणाई, गणपती इतक्याच उत्साहाने शिमग्यालाही गावी पळू लागलीय. असं काय असतं या शिमग्यात?
आपल्या गावासरीक शिमगा दुसऱ्या कुटेच नाय, असा कोकणी लोकांना अभिमानच असतो. रत्नागिरी, संगमेश्वर पट्ट्यात शिमग्याची मजा काही निराळीच असते. खरंतर प्रत्येक गावागणिक शिमग्याच्या पद्धतींमध्ये लहान-सहान बदल दिसतात. शिमग्यापूर्वी होणाऱ्या 'बैठका', पालखीबरोबर फिरणं, पालखी नाचवणं या सगळ्या गोष्टी तरुणाईला नव्याने भुरळ घालतायत. हा उत्सव म्हणजे ग्रामदेवतांचा उत्सव. शिमग्यापूर्वी महिनाभर अगदी लहानमोठ्या गावांतून उत्सवाचं नियोजन ठरवणाऱ्या 'बैठका' होतात. त्यासाठीही अनेक तरुण चाकरमानी हजेरी लावतात. अख्या गावावरच एक उत्सवीपणाची झुल दिसते. गावच्या एखाद्या म्हाताऱ्याकडून येणारे आपुलकीचे चार शब्द समस्त चाकरमान्यांना या उत्सवाकडे अक्षरशः ओढून आणतात. शिमग्यात वाजणारे ढोल-ताशे हे शिमग्याचं आणखी एक आकर्षण. अशी झिंग देणारा फक्त शिमगाच!
कोकणात पंचमीलाच रंग खेळले जातात. संगमेश्वरात फक्त लाल रंगात खेळली जाणारी रंगपंचमी अर्थात शिंपणं.. म्हणजे तर साऱ्या जिल्ह्याचं आकर्षण. मग चाकरमानी तिथे हवेतच...
सहाण भरणं हा आणखी एक सोहळा...पालखीची पूजा..नमन, खेळे या सगळ्याची तर मजाच न्यारी... प्रत्यक्ष होमाच्या म्हणजे होळीच्या दिवशी तर वेगळीच मजा. त्याची तयारी आदल्या रात्रीपासूनच सुरु होते. होळी सजवण्यासाठी पताका लावणं. लाकडं जमा करणं. वेळप्रसंगी चोरून आणणं आणि मग ढोल ताशांच्या गजरात होळीची पूजा आणि होम लावणे...पुरणाची पोळी तर असतेच. यासोबत फाक घालणे म्हणजे अधिकृतरित्या एकमेकांच्या नावाने बोंबा मारण्याचा एक धम्माल अनुभव. वर्षभराचा राग, उखाळ्यापाखाळ्या या सगळ्याला उत्स्फूर्तपणे वाट मोकळी करून द्यायची आणि आपापसातले मतभेद होळीसोबत दहन करून टाकायचे. ही एक वेगळाच अनेक गावांतून या शिमग्याच्या निमित्ताने खास नमन, देवीचे खेळे, संकासूर आदी कलाप्रकारही उत्साहात साजरे होतात. होळीच्या निमित्ताने खास पालख्या नाचवण्याचा कार्यक्रमही अनेक ठिकाणी होतो. हेच पालखीनृत्य आता विविध नृत्यस्पर्धांतूनही उत्साहाने साजरं केलं जातं. हा सगळा उत्सवी वारसा महानगरांच्या गर्दीत आणि धबडग्यात कसा मिळणार? तो घ्यायला गावच गाठायला हवं. त्यामुळेच शिमग्याचं हे ऋण शिमग्यातच फेडायला हवं..
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट