'मराठी पद्धतीचे दागिने...ईss सो ओल्ड फॅशन' असं आता बिलकूल म्हणता येणार नाही. तोडे, पाटल्या, बिल्वर, बाजूबंद, ठुशी अशा खास मराठमोळ्या दागिन्यांची फॅशनच सध्या 'इन' आहे. पारंपरिक कपड्यांवरच नव्हे तर पाश्चिमात्य पेहरावावरही हे दागिने खुलून दिसतायत...
पायघोळ स्कर्ट, त्यावर टीबॅग आणि गळ्यात चक्क पुतळ्यांची माळ, पण जरा वेगळ्या पद्धतीने गुंफलेली...लग्नसमारंभात वेस्टर्नाइज्ड कड्यांना मागे टाकत पिछोड्यांनी आणि पाटल्यांनी मारलेली बाजी हे आजकाल सर्रास पाहायला मिळतंय. कारण मराठी दागिने आता फॅशनविश्वात प्रसिद्ध झाले आहेत. बॉलिवूड, टीव्हीमधल्या कलाकृतींमध्ये मराठी कुटुंबांनी स्थान मिळवलं. साहजिकच मराठमोळे कपडे आणि दागिने याविषयीही फॅशनविश्वाला उत्सुकता वाटू लागली आहे. त्याचंच प्रतिबिंब सिनेमातून दिसतं आहे. तरुणाईलाही या दागिन्यांनी भुरळ घातली आहे.
आगामी 'मस्तीजादे'मध्ये सनी लिऑनने अस्सल मराठमोळा पेहराव केलाय. त्यातली ठसकेबाज नथ पाहून सनी खूश झाली. 'मला जाऊ दे' या गाण्यात विद्या बालनने नथ घातली होती. त्यानंतर हा प्रकार तिला भलताच आवडला. आगामी 'बाजीराव-मस्तानी'मध्ये प्रियांकाने हिरवा चुडा, मोत्याच्या कुड्या, बिल्वर आणि तोडे घातले आहेत. या लुकचा तिने सोशल साइटवर पोस्ट केलेला पहिला फोटोसुद्धा हिरवा चुडा, बिल्वर आणि पाटल्यांचाच होता. मराठी अभिनेत्रींमध्ये उर्मिला कानेटकरने तिच्या एका सिनेमाच्या प्रिमीअरसाठी पैठणीचा ड्रेस खास शिवून घेतला होता. यावर तिने नेकपीस म्हणून चक्क पुतळ्यांची माळच ड्रेसला शिवली होती. सोबत चंद्रकोर आणि दंडात बाजूबंदही घातले होते.
पाडव्याच्या निमित्तानं...
हे दागिने आपल्या मराठमोळ्याच नव्हे तर पाश्चिमात्य पेहरावावरही घालता येतील. गुढीपाडव्यानिमित्तही यातली काही कॉम्बिनेशन्स तुम्हाला ट्राय करता येतील.
-जीन्स-टॉपवर एकच दागिना घालायचा असेल तर गळ्यात पुतळ्यांची माळ घालू शकता किंवा नाकात चमकीही घालू शकता.
-एखाद्या स्लिवलेस ड्रेसवर मराठमोळा बाजूबंद खुलून दिसेल.
-गळाबंद पंजाबी ड्रेसवर किंवा टॉपवर कानात फक्त मोत्याच्या कुड्या ट्राय करू शकता.
-केसात खोवायचं सोन्याचं फूलही एखाद्या हेअरस्टाइलमध्ये वापरू शकता किंवा प्लेन ड्रेसवर ब्रोच म्हणूनही वापरता येईल.
तरुणाईही प्रेमात
तरुणाईनेही हे मराठमोळे दागिने उचलून धरले आहे. त्यामुळे विविध कॉलेज फेस्टमध्ये तरुणी मुद्दामहून असे दागिने मिरवताना दिसतात. कानात भिकबाळी घालणं हे फॅशन स्टेटमेंट तर मुलांनी केव्हाच पॉप्युलर केलं आहे. पुतळ्यांची माळ, ठुशी, मोहनमाळ, लक्ष्मीहार, चमकी, मोत्यांच्या कुड्या, कोल्हापुरी साज हे दागिने मुली अनेक प्रसंगी आवर्जून वापरताना दिसतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट