Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

रंगात रंगतो

$
0
0

मृण्मयी नातू

रंगपंचमीच्या दिवशी वर्षातून एकदा सगळेजण एकमेकांना मनसोक्त रंग फासत असतात. पण कॅनव्हासवर रंगांची उधळण करणारे चित्रकार मात्र कायम रंगांशीच खेळत असतात. त्यांच्या आयुष्यात रंगांचं खूप महत्त्व असतं. रंगांनीच त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप काही मिळवून दिलंय. रंगपंचमीच्या निमित्ताने 'मुंटा'ने काही चित्रकारांशी संवाद साधला आणि 'रंगांकडे तुम्ही कसं बघता' हे खास त्यांच्याच शब्दांत जाणून घेतलं.

प्रत्येकजण आपापल्या स्वभावानुसार रंगांची निवड करतो असं म्हणणं आहे चित्रकलेतल्या एका प्राध्यापक तरुणीचं. एसएनडीटीमध्ये लेक्चरर म्हणून काम करणारी २८ वर्षीय रोहिणी शिंदे कॉलेजच्या विद्यार्थिनींना 'ड्रॉइंग' आणि 'पेंटिंग' शिकवते. यात ती टूडी, म्युरल, पिक्टोरिअल अशा गोष्टींचा समावेश आहे. ती म्हणते, की 'प्रत्येक रंगाची स्वतःची अशी एक वेगळी शक्ती आहे. फक्त ती कॅनव्हासवर उतरवण्यातच कलाकाराचं खरं कसब असतं. कारण प्रत्येक रंगाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो. त्यामुळे रंगसंगतींवर विशेष भर द्यावा लागतो'. रोहिणीला तिच्या स्वभावानुसार शांततेचं प्रतिक असलेला पांढरा आणि निळा रंग आवडतो.

काही चित्रकारासाठी हे रंग चिंतनाचं माध्यम ठरतं. 'मुळात निसर्गामध्येच कितीतरी रंग भरुन राहिले आहेत. रंग हे केवळ माध्यम नसून चित्रनिर्मितीच्या प्रक्रियेतला एक अत्यंत महत्वाचा साथीदार आहे. चित्रातल्या विषय-आशयाचं प्रकटीकरण करताना आवश्यक ती रंगयोजना साधता येणं हा माझ्यासाठी चिंतनाचा विषय आहे', असं व्यावसायिक चित्रकार असलेला मनोज पातुरकर सांगतो. लवकरच त्याच्या चित्रांचं एक प्रदर्शन दुबईमध्ये भरतंय.

शाळेतल्या विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या माध्यमातून रंगांचं वेड लावण्याचं काम करतोय कर्नाळ्याचा कौशल म्हात्रे. फिल्म मेकिंग या विषयात त्याने 'मास्टर्स इन फाइन आर्टस' केलं आहे. हा चित्रकार सध्या विरारच्या एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शाळेत चित्रकला शिकवतो. 'मला लहानपणापासूनच रंगांचं खूप आकर्षण होतं. आणि याच रंगांमुळेच आज माझ्या विद्यार्थ्यांशी माझं घट्ट नातं जोडलं गेलंय. खरं तर मला सहज जाहिरात कंपनीत नोकरी मिळाली असती. मात्र मी स्वतःहून शिक्षकी व्यवसायाची निवड केलीय. एका परीनं मी रंगांच्या शिकवणीचा वारसा पुढे नेतोय', असं कौशल सांगतो. शाळा सुटल्यावरही तो जवळपासच्या मुलांना चित्रकला शिकवत असतो. वसईच्या निसर्गरम्य पट्ट्यात राहणाऱ्या या चित्रकाराचा हिरवा रंग सगळ्यात आवडता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>