बालरोग तज्ज्ञ आणि भावनांक विशेषज्ञ (एमडी, डीसीएच)
परीक्षा संपल्यानंतर निकाल लागेपर्यंतचा काळ माझ्या टीनएजर मुलीसाठी अतिशय अवघड जातो. त्यावेळी मी तिची कशी काळजी घेऊ?
- श्रुती गोडबोले
परीक्षेचा निकाल लागेपर्यंतचा काळ हा बऱ्याच मुलांसाठी कठीण असतो. भीती, घालमेल, ताणतणाव, नर्व्हस होणं अशा विविध भावना यावेळी मुलांच्या मनात तयार होतात. त्यांना सामोरं जाणं मुलांसाठी आव्हानात्मक असतं. काहींच्या मनावर याचा विपरीत परिणामही होऊ शकतो. निकालाचा दिवस जवळ येऊ लागताच मनातील धाकधुक अधिकच वाढू लागते. अशावेळी पालकांची जबाबदारी वाढते. मुळात आपल्यावर ताण आलाय, याची जाणीव मुलांना देणं गरजेचं आहे. आपल्याला अपेक्षित गुण मिळतील की नाही? इतरांच्या अपेक्षांचं ओझं पेलता येईल की नाही? कमी गुण तर नाही ना मिळणार? पास होऊ की नाही? असे अनेक प्रश्न मुलांच्या मनात येत असतात. त्यामुळेच त्यांची घालमेल वाढते. याचं कारण असतं, काल्पनिक आणि नकारात्मकतेकडे झुकणारे विचार. मुलांना या भावनांची ओळख करून द्या. त्यांना समजवा की, मनातल्या या काल्पनिक विचारांना आपण नियंत्रणात ठेवायला हवं. त्याचा अतिविचार करू नये. तसा केल्याने तो ताण आणखीच वाढत जातो.
तुमच्या मुलीला समजवा की, तू पूर्णपणे कष्ट करून सर्व क्षमतेनुसार परीक्षेला सामोरी गेली आहेस. त्यामुळे येणारा निकालही सहज स्वीकार. हा निकाल महत्त्वाचा आहे, पण तो आयुष्यातील एक टप्पा आहे. संपूर्ण आयुष्य नव्हे. अशा प्रकारच्या विचारांनी अनिश्चितता कमी होण्यास नक्कीच मदत होईल. याशिवाय मुलांना सुट्टीतही व्यायामाची, योगाची सवय ठेवा. आपल्या जवळच्या व्यक्तींशी, पालकांशी, मित्र-मैत्रिणींशी मनमोकळा संवाद केल्यानंही मनावरचं बरंच दडपण हलकं होतं.
शब्दांकन : दीपेश वेदक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट