नव्या नव्या गोष्टी शिकून घेण्याची मला हौस आहे. शाळेत असताना माझी चित्रकला चांगली होती. त्यामुळे मग मेंदी काढायला शिकायचं ठरवलं. पण मी कोणत्याही क्लासला गेले नाही. दुसऱ्यांना काढताना बघूनबघूनच मी मेंदी काढायला लागले. थोड्याशा सरावाने माझा हात छान बसला. भारतीय पद्धतीची आणि अरेबिक पद्धतीची असे मेंदीचे दोन्ही प्रकार मी स्वतःच सराव करून शिकले.
सुरुवातीला प्रयोग म्हणून मैत्रिणींच्या हातावर मेंदी काढायचे. पण एक दिवस अचानक मला मेंदी काढण्याची ऑर्डर मिळाली. मला नवल वाटलं पण मी विचार केला, कॉलेज चालू असताना नव्हे तर सुट्टीमध्ये अशा ऑर्डर्स घ्यायला काय हरकत आहे? मग माझा निर्णय पक्का झाला. आता मी लग्नातील मेंदीच्या ऑर्डर्स मोठ्या आत्मविश्वासाने घेते. नववधूची खास मेंदी, घरातील इतर बायकासाठी मेंदी, साखरपुड्याची किंवा पूजेच्या निमित्ताने काढायची मेंदी अशा सगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स मी घेते. सुट्टीचा काळ म्हणजे लग्नसराईचा काळ असल्याने या दिवसात भरपूर काम करायला मिळतं. अनुभवही भरपूर मिळतो. सुट्टीच्या काळात मेंदी काढायला गेल्याने माझी सुट्टी फुकट गेलीय असं मला कधीही वाटत नाही. उलट रोजच्या अभ्यासातून एक वेगळा बदल मिळतो आणि पैसेही.
आता मी माझा हा छोटासा व्यवसाय आणखीही वाढवायचं ठरवलंय. मी काही ठिकाणी मेंदी शिकवण्याचे वर्गही घेते. शिक्षण घेण्याबरोबरच या लहानश्या व्यवसायामुळे मी पैसेही कमावते. महत्त्वाचं म्हणजे मला स्वतःच्या पायांवर उभं राहण्याची संधी मिळते आहे. शिवाय भरपूर अनुभवही. माझ्या एका छोट्याशा छंदाने आज चक्क व्यवसायाचं रुप घेतलंय.
संकलन : आकांक्षा मारुलकर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट