जितक्या सहजतेनं त्या संसारातल्या विविध जबाबदाऱ्या पेलतात; तितक्याच सहजतेनं त्या साहसी खेळांशीही दोन हात करतात. अॅडव्हेंचर स्पोर्ट़्समध्ये महिलांचा टक्का वाढतो आहे.
'तू नाही ट्रेकला जायचंस हं, ते काही मुलींचं काम नाही', 'काय व्हॅली क्रॉसिंग आणि कयाकिंग, नको तुला झेपणार नाही', 'दोन महिने घराबाहेर राहून बेसिक कोर्स करण्याची खरंच गरज आहे का', 'इतकी जड गाडी तुला झेपणार आहे का, उगाच नसतं साहस करू नकोस', अशा नकारात्मक प्रश्नोत्तरांतून बाहेर पडत त्यांनीही आता साहसी खेळांत आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. जितक्या सहजतेनं त्या संसाराच्या जबाबदाऱ्या निभावतात, तितक्याच निर्भयतेनं त्या साहसी उपक्रमांत करिअरही शोधत आहेत. ट्रेकिंग, कयाकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाईंबिंग, बाइक आणि हॉर्स रायडिंग, राफ्टिंग, अशा सगळ्यांच खेळांत मुली आणि महिलांचा टक्का वाढतो आहे.
पसरले पंख
ट्रेकिंगमध्ये मुलींचा सहभाग आहेच; शिवाय इतर साहसी खेळांतही त्यांनी बाजी मारली आहे. मुलींना या खेळात पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी खूप काळ जावा लागला, असं अनेकींना वाटतं, तर अनेक आव्हानं पेलूनच पंख पसरल्याची भावना काहीजणी व्यक्त करतात. त्याविषयी बोलताना सानिया माने म्हणाली, 'स्वतःविषयी तितकासा आत्मविश्वास नसल्यानं असो किंवा आपली नेहमीची कारणे असोत. ट्रेकिंग वगळता मुली इतरत्र दिसत नसत. आता ही परिस्थिती बदलली आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलून साहसी खेळांत मुली चमकत आहेत. गृहिणीही स्वतः ग्रुप करून ट्रेकला जात आहेत. हा बदल अचानक घडलेला नाही. पुरुष मित्रांनीही पाठिंबा देत, आत्मविश्वासाला चालना देत या गोष्टी बदलण्यासाठी मदत केली आहे. घरांतूनही पाठिंबा मिळाल्यानं ही भरारी शक्य झाली आहे.'
पाठिंबा आणि प्रोत्साहन
साहसी खेळांत वाढलेल्या टक्क्याचं श्रेय त्यांच्या स्वतःच्या हिमतीला आणि कणखरतेला असलं, तरी अनेकींना मित्रांचा पाठिंबा आणि घरच्यांचं प्रोत्साहनही मोलाचं वाटतं. 'आईनं सतत पाठिंबा दिल्यानं मी या क्षेत्रात येऊ शकले. त्याचबरोबर मला रॉक क्लाइंबिंगचे धडे अजय मोरे या मित्रानं दिले, तर माउंटेनिअर श्रीपादनं मला खूप काही शिकवलं. या क्षेत्रातलं मित्रांचं वर्तुळ मला समृद्ध करणारं ठरलं. आज मुली सह्याद्रीत आणि हिमालयातल्या मोहीमाही सहजतेनं लीड करत आहेत,' असं माउंटेनिअर प्राजक्ता घोडे सांगते.
रणरागिणी
ईशानी सावंत, प्राजक्ता घोडे, सानिया माने, प्राची शिंदे आणि श्रद्धा मेहता या पुण्यातल्या युवती सध्या साहसी खेळांत चमकत आहेत. शिक्षण करतानाच ट्रेकिंग व इतर साहसी खेळांतही त्यांचा सहभाग आहे. या क्षेत्रातही करिअरचे पर्याय निवडून अधिकाधिक मुलींना साहसाकडे वळवण्यासाठीही त्या सातत्यानं प्रयत्न करत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट