गुढीपाडव्याच्या सणाला एकमेकांना शुभेच्छा देत आनंदाची उधळण केली जाते. आपल्याबरोबरच इतरांच्या आयुष्यातही आनंदाचे चार क्षण यावेत यासाठी झटणाऱ्या काही तरुणांची ओळख पाडव्यानिमित्त 'मुंटा' तुम्हाला करून देतोय...
त्यांच्या मदतीसाठी
अंध, अपंग लोकांचं आयुष्य सुखकर व्हावं यासाठी काहीजण तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रयत्न करत असतात. के.जे. सोमैय्या पॉलिटेक्निकमधले काही तरुण विद्यार्थी हे त्यातलंच एक उदाहरण. त्यांच्या या अनोख्या प्रोजेक्टमधून या मंडळींचं दैनंदिन आयुष्य सुखकर होऊ शकेल. त्यासाठी त्यांनी री-आर्मसारखा तांत्रिक हात, स्मार्ट ब्लाइंड स्टीक, आय ग्लास नेव्हीगेशन आणि ग्लोव्हज सेन्ससारख्या यासारख्या भन्नाट कल्पनांवर आधारीत काही प्रोजेक्टस तयार केले आहेत. यश, वृत्तांत, सिद्देश, हर्ष, तन्मय, यस, गौरव बी, शीवम, ब्रीनव आणि सिद्धार्थ अशी या मुलांची नावं आहेत.
एखाद्या व्यक्तीला एक हात नसेल तर हा रि-आर्म त्याच्यासाठी वरदान ठरेल. दीड लाखांपासून सुरू होणाऱ्या रोबोटीक आर्मच्या तुलनेत या विद्यार्थ्यांनी अवघ्या साडेपाच हजारांत हा हात बनवला आहे. तो ऑपरेट करण्यासाठी एक अँड्रॉइड अॅपही तयार करण्यात आलं असून ते व्हॉइस कमांडवर काम करेल. हा हात तीन वेगवेगळ्या प्रकारे वापरता येईल. सिंगल मोडवर हा हात एखाद्या सामान्य हाताप्रमाणे काम करेल. मिरर मोडवर दुसरा (खराखुरा) हात जी क्रिया करेल तीच क्रिया हा यांत्रिक हात करेल. तर एक्सरसाइज मोडवर हा एक हात गमावलेल्यांना एक्सरसाइज करण्यासाठीही उपयोगी ठरणार आहे.
अंध लोकांसाठी असलेल्या तस्मार्ट स्टीकमध्ये तीन जागी सेन्सर्स असल्याने परिसराचा अंदाज घेऊन हे सेन्सर्स अंध व्यक्तीला मार्गाबद्दल सूचना करतील.
अंध व्यक्तींना मार्ग 'दाखवण्यासाठी' तयार केलेल्या या गॉगल सदृश्य यंत्रामध्ये कॅमेरा आणि अल्ट्रसॉनिक सेन्सर्सचा वापर केला आहे. समोरची वस्तू किती अंतरावर आहे याची माहिती घेऊन हे सेन्सर्स हेडफोनच्या माध्यमातून अंध व्यक्तीला चालण्याची दिशा सुचवतात. गॉगलमधला कॅमेरा आणि हेडफोन्ससाठी देण्यात आलेल्या पॉवरबँकच्या उर्जेवर ही सर्व सिस्टीम काम करते. अंध व्यक्तींना बाहेर वापरता येण्याबरोबरच मुख्यत्वे घरात वावरताना या ग्लोज उपयोगाचे ठरतील. ठराविक अंतरावर वस्तू असल्यास हे ग्लोज बझरच्या सहाय्याने अंध व्यक्तीला मार्गात अडथळा आल्याचे संकेत देतील. तसेच यावर एक पॅनिक बटण ही देण्यात आले आहे. संकटसमयी अंध व्यक्तीला या बटणाचा वापर करता येईल.
ज्यांचं कुणी नाही...
ज्यांचं कुणीही नाही त्यांना आधार देणारा एक तरुण कोल्हापुरात आहे आणि त्याचं नाव आहे सुशांत टक्कळकी. ३१ वर्षांचा हा तरूण रस्त्याच्या कडेला पडलेल्या कुणाही निराधार लोकांसाठी धावून जातो. वयाच्या १७ व्या वर्षापासून सुशांतचं हे अनोखं व्रत सुरू आहे. 'ज्यांचं कुणी नाही त्यांचा मी' अशी स्वत:ची ओळख सांगताना सुशांतच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसतं ते कदाचित पाच आकडी पगार घेणाऱ्या मुलाच्या चेहऱ्यावरही दिसणार नाही कदाचित.
२००३ सालातली एक संध्याकाळ सुशांतच्या मनाला अस्वस्थ करणारी ठरली. अवघ्या १७ वर्षाचा सुशांत त्यावेळी दुधाची एजन्सी चालवत होता. एक वृद्ध व्यक्ती कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तोंड खुपसून काहीतरी खात असल्याचं सुशांतला दिसले. सुशांतने पाहिलं, तर दोन्ही हात नसलेला तो वृद्ध कचऱ्यातले अन्नपदार्थ शोधून खाण्याचा प्रयत्न करत होता. ते पाहून सुशांतच्या अंगावर काटा आला. त्याने त्या वृद्धाला जवळच्या दवाखान्यात नेऊन प्राथमिक उपचार केले. सरकारी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. त्यावेळी सुशांतने त्या निराधार वृद्धाला घास भरवण्यापासून आंघोळ घालण्यापर्यंत त्याची सेवा केली. तो बरा झाल्यानंतर त्याला एका वृद्धाश्रमातही पोहोचवलं. या निमित्ताने सरकारी रूग्णालयातल्या अनेक निराधार रूग्णांशी सुशांतची ओळख झाली आणि सुशांत त्या सगळ्यांचा मुलगा बनला. आज कोल्हापुरात कुठेही कुणी निराधार माणूस दिसला की सुशांतला फोन येतो आणि सुशांत त्याच्यासाठी धाव घेतो. आजपर्यंत दीडशे आजारी, निराधार व्यक्तींची सुशांतने सेवा केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट