बालरोग तज्ज्ञ आणि भावनांक विशेषज्ञ (एमडी, डीसीएच)
माझ्या मुलीची परीक्षा काही दिवसांवर आली आहे. परीक्षेसाठी तिची मानसिक तयारी कशी करावी? घरात अभ्यासाचं वातावरण कसं निर्माण करावं?
परीक्षांच्या काळात घराघरांमध्ये अभ्यासाचं वातावरण पसरलेलं दिसतं. घालमेल, चिंता, काळजी, भीती, अनिश्चितता अशा अनेक भावनांचं एक विचित्र मिश्रणही झालेलं दिसतं. पण कौटुंबिक वातावरण प्रेशर कुकरसारखं होऊ नये, यासाठी काय करायचं ते बघूया.
परीक्षेचा बागुलबुवा करून मुलाला मार्कांसंबंधी सतत प्रश्न विचारू नका. उपदेश देऊ नका. त्यांच्याशी नेहमीप्रमाणेच वागा. मुलाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर उदा. टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर, आदी गोष्टींवर आग्रहाने वेळेचा निर्बंध घालणं गरजेचं आहे. पण सक्ती करू नका. मुलाच्या मागे सतत अभ्यासाबद्दल भुणभुण न लावता त्याला ध्येयाबद्दल जागृत करा. वेळेचं नियोजन करा. अभ्यासाची आखणी करा. विषयानुरूप अभ्यासक्रम लिहून काढा. तो विशिष्ट वेळेमध्ये कसा पूर्ण करता येईल, याबद्दल मुलाला उत्तेजन द्या. परीक्षेच्या आधी काही दिवस सरावासाठी आणि उजळणीसाठी वेळ ठेवावा. एखादा विषय अवघड जात असल्यास त्याला प्राधान्य देऊन वेळेचं नियोजन करावं. हे सर्व शक्यतो मुलांनी करावं. तुम्ही केवळ मार्गदर्शक म्हणून मागे उभे राहा. मुलाला परीक्षेची भीती वाटू देऊ नका.
अभ्यासाच्या नियोजनासह मुलाच्या झोपेकडे तसंच खाण्यापिण्याकडेही लक्ष द्या. साधारण सात ते आठ तास झोप असणं आवश्यक आहे. मुलाला रात्री-अपरात्री जागरण करू देऊ नका. अभ्यास स्मरणात राहण्यासाठी मेंदूमधील विविध सिस्टिम्स कार्य करत असतात. त्यामुळे खास करून परीक्षेच्या काळामध्ये 'क्वालिटी स्लीप'ला प्राधान्य द्यावं. झोप थोडी मिळाली तरी ती शांत मिळावी. अन्न पदार्थांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असावं. तसंच आहार योग्य वेळेत घ्यावा. परीक्षेच्या काळामध्ये बाहेरील खाद्यपदार्थ (विशेषतः जंक फूड आणि कोल्ड ड्रिंक्स) पूर्णपणे टाळावीत.
ताण तणाव कमी करण्यासाठी अभ्यासाच्या वेळेच्या व्यतिरिक्त अर्धा ते एक तास मैदानी खेळ (दुखापत होणार नाही असे) खेळू देणं, श्रेयस्कर ठरेल. घरात थोडे जोक्स, गप्पा गोष्टी करून वातावरण हसतं खेळतं राखा. मुलांकडून रोज थोडासा व्यायाम तरी झाला पाहिजे. शिवाय मुलांना दिवसाच्या एका वेळीतरी १०-१५ मिनीटं डोळे मिटून शांत बसायला लावा. त्यामुळे मन शांत होईल.
परीक्षा तोंडावर आल्यावर अभ्यासाला लागण्याऐवजी आधीपासूनच अभ्यास करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्या. महत्त्वाच्या नोट्स वाचणं, विविध विषयांवर नजर फिरवणं, हे करता येईल. परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत पुस्तक वाचत राहणं निरुपयोगी ठरतं. परीक्षेच्या आधी चोवीस तासात कुठल्याही नवीन गोष्टींचा अभ्यास करायला सांगू नका. झालेल्या पेपरमधील प्रश्नांबद्दल मुलांशी चर्चा करू नका. परीक्षेचं दप्तर आदल्यादिवशीच तयार करून ठेवा. म्हणजे हॉलतिकीट, पेन, पेन्सील, पट्टी इ. साहित्य. वेळेपूर्वी १५ मिनीटं परीक्षा केंद्रात पोहोचा.
शब्दांकन : दीपेश वेदक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट