कपडे आपलं व्यक्तिमत्व खुलवितात आणि महाग तसेच सुंदर कपडे घालण्याची हौस सगळ्यांनाच असते. महागडे कपडे जास्त काळ टिकावे, ते जास्त काळ आपल्याला वापरता यावेत, यासाठी या कपड्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. कपड्यांची व्यवस्थित काळजी घेतली, तर वर्षानुवर्षे कपडे नव्यासारखे दिसतात.
कपडे चांगल्या साबण आणि पावडर लावून वॉशिंग मशिनमध्ये धुणे किंवा ड्रायक्लिनला टाकणे यापलिकडे कपड्यांची फारशी काळजी घेतली जात नाही. कपड्यांची खास काळजी घेण्यासाठी काही सोप्या आणि सरळ बाबी लक्षात ठेवल्यास कपडे फार काळ टिकतात.
कोणतेही कापड शिवायला टाकण्याआधी घरीच स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर प्रेस करून मग शिवायला द्यावे. त्यामुळे कपड्यांचा खरा आकार शिवणाऱ्याला मिळतो आणि फिटींगही चांगली येते.
कॉटनच्या कपड्यांना इस्त्री करताना उलट बाजूने करावी. कपड्याचा रंग टिकून राहतो. एम्ब्रॉयडरी केलेल्या कपड्यांवर पातळ कापड तर सिल्कच्या कापडावर पेपर टाकून प्रेस करावी. जरीच्या साड्यांमध्ये एखाद्या कापडात बांधून किंवा गुंडाळून डांबरगोळ्या ठेवाव्यात. यामुळे या डांबर गोळ्यांचे डाग साड्यांवर पडणार नाहीत.
खास पांढऱ्या कपड्यांना धुतल्यानंतर एका बादलीत लिंबू पिळून त्या पाण्यात ते कपडे बुडवून काढावेत. असे केल्यास पांढरे कपडे अधिक पांढरे शुभ्र दिसतात. तसेच इलेस्टिक असलेले कपडे उदाहरणार्थ स्कर्ट, शाळेच्या हाफ पॅँट, नाईट पँट अशा कपड्यांना गरम पाण्यात भिजवू नये. यामुळे इलेस्टिक सैल पडते.
काळ्या रंगाच्या कपड्यांना गरम पाण्यात उकळलेल्या शिकेकाईच्या पाण्यात भिजवावे. काळे कपडे पांढरे पडणार नाहीत. सिल्कच्या कपड्यांना थंड पाण्यात शॅम्पू टाकून भिजवावे. त्याचप्रमाणे जरीच्या साड्या बादलीभर पाण्यामध्ये शिकेकाई आणि त्यात किसलेला गूळ टाकावा. गूळ विरघळल्यावर या मिश्रणात साधारण दहा मिनिटे जरीच्या साड्या भिजवून ठेवाव्यात. साडी आणि जर दोन्ही चकाकू लागतील, तर लोकरीच्या कपड्यांसाठी बाजारात मिळणारे सोल्यूशन चालते. महत्वाचे म्हणजे वॉशिंग मशिनच्या ड्रायरमध्ये लोकरीचे कपडे कधीही टाकू नये, यामुळे कपडे आणि मशिन दोघांचे नुकसान होते.
कपडे जास्त गरम पाण्यात भिजवू नये, लोकर आणि सिल्क कापड्यांची पाण्यात स्ट्रेंग्थ कमी होते, तर कॉटनची वाढते. यासाठी सिल्क आणि लोकरीच्या कपड्यांना जास्त काळ पाण्यात ठेऊ नये. कपड्यांचा रंग एकमेकांना लागू नये यासाठी वेगवेगळे भिजवून मग धुवावे. अशी खबरदारी घेतल्यास कपडे दीर्घकाळ टिकतात. - उज्ज्वला मावळे, प्राचार्य, गोदावरी कॉलेज ऑफ फॅशन टेक्नॉलजी, जळगाव
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट