(बाल चिकित्सक, बालरोगतज्ज्ञ, भावनांकतज्ज्ञ)
प्रश्न: नवजात बालकाची काळजी कशी घ्यावी? त्याला कोणत्या गोष्टींचा धोका असू शकतो?
उत्तर : नवीन जगात पदार्पण केल्यावर नवजात अर्भकाला अनोळखी वातावरणाशी सामना करावा लागतो. बाह्य वातावरणातील प्रकाश, तापमानातील बदल, विविध आवाज हे सगळं सहन करताना अवघड वाटणं अगदी स्वाभाविकच असतं. कमी वजनाच्या किंवा कमी महिन्यांच्या (प्रीमॅच्युअर) अर्भकांची खास काळजी घेणं आवश्यक असतं. सरासरी अडीच ते तीन किलोपर्यंतचं वजन हे नॉर्मल मानलं जातं. अडीच किलोपेक्षा कमी वजनाच्या बालकांमध्ये त्वचेखालील ब्राऊन फॅट कमी असतात. त्यामुळे बाह्य तापमान कमी असल्यास शरीराच्या आतील तापमान अचानक कमी होऊन बाळाच्या जीवास धोका संभवतो. अशा बालकाला (खास करून दोन किलो वजनाखालच्या) व्यवस्थित उबदार कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवणं व गरज असल्यास इनक्यूबेटरमध्ये ठेवणं आवश्यक असतं. अतिशय कमी म्हणजे दीड किलोहून कमी वजनाच्या मुलांना मात्र, नवजात अर्भकांच्या अतिदक्षता विभागात ठेवणं गरजेचं असतं. असा विभाग प्रसृतीगृहापासून दूर असेल तर बाळाला प्रसुतीगृहापासून अतिदक्षता विभागात नेताना वशििष्ट पद्धतीने थर्मोकोल बॉक्समधून नेणं अत्यावश्यक असतं.
सर्व नॉर्मल वजनाच्या बालकांना फक्त स्तनपान करणं आवश्यक आहे. जन्मापासून पहिल्या अर्ध्या तासात जर स्तनपान सुरू केलं तर मातेचे दुध कितीतरी पटीने जास्त व लवकर सुरू होतं, असं संशोधनातून निष्पन्न झालं आहे. सुरुवातीला दोन दिवस येणाऱ्या दुधाला 'कॉलोस्ट्रम' म्हणतात. बाळाला त्यापासून रोगप्रतिकारक शक्ती मुबलक प्रमाणात मिळतात. स्तनपान चालू असताना बाळाला दुध पुरतं आहे ना, हे पाहण्याची गरज आहे. त्यासाठी बाळाचं वजन दररोज १५-२० ग्रॅम वाढतं आहे ना, तसंच त्याला दिवसातून किमान ५-६ वेळा लघवी होते आहे ना, याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जवळ जवळ ५० ते ६० टक्के बालकांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी थोड्याफार प्रमाणात कावीळ होते. त्यासाठी लगेचच घाबरून जायची गरज नाही. केवळ तिचं प्रमाण वाढत नाही ना याची तज्ज्ञ डॉक्टरांकडून रोजच्या रोज तपासणी करून घ्या.
नवजात अर्भाकामध्ये डोळे, नाक, चामडी यांची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. कारण बाळाला हाताळताना त्यातून जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते. सुरुवातीला बाळाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीने काटेकोरपणे स्वच्छता पाळावी. वर उल्लेख केलेली सर्व प्रकारची काळजी घेतल्यास बाळाच्या पहिल्या महिन्यात कुठलाही प्रकारचा त्रास संभवत नाही. तरीही बाळाचं निपचित पडून राहणं, ते कमी खेळकर वाटणं, त्याचं लघवीचं प्रमाण दिवसातून पाचपेक्षा कमी होणं, श्वासोच्छावासाला त्रास होणं, बाळाचं अंग गार पडणं, ताप येणं, त्याने दुध व्यवस्थित न पिणं आदी लक्षणं दिसून आल्यास त्वरित बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
शब्दांकन : दीपेश वेदक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट