हरवलेल्या मोबाइलमधला खासगी डेटा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं, एका जोडप्यानं आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे, तुमच्या मोबाइलमध्ये कोणता डेटा ठेवावा, तो कसा हाताळावा याबद्दल गांभीर्यानं विचार करायची वेळ आली आहे. त्याविषयीच...
मोबाइल हरवल्यानं तो चिंतेत होता. कारण त्या मोबाइलमध्ये त्याचे बायकोसोबतचे काही खासगी व्हिडिओज त्यानं ठेवले होते. काही तासांतच ते व्हिडीओ व्हॉट्सअॅप आणि सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल झाले. त्यानंतर त्या जोडप्यानं आत्महत्या केली. मध्यप्रदेशात घडलेला हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर सगळेच हादरलेत. मोबाइल फोन हरवला, की फोन गेल्याचं दुःख. शिवाय त्यातले सगळे काँटॅक्ट्स गेल्याचा त्रास व्हायचा. पण स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे आता ते तेवढ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. फोन हरवला की त्यातले खासगी फोटो आणि व्हिडीओ यांचा गैरवापर होईल की काय याची भीतीही वाटू लागली आहे. त्यामुळेच मोबाइलमध्ये कोणता डेटा ठेवावा याबद्दल काळजी घेणं खूप गरजेचं झालं आहे असं सायबरतज्ज्ञ सांगतात.
फोटोज, व्हिडीओज डाऊनलोड करून आपण तसेच ठेवतो. मोबाइल चोरीला गेल्यानंतर हा सगळा खासगी डेटा चोराच्या हाती आयताच मिळतो. त्यामुळे मोबाइलवर किती आणि काय डेटा ठेवावा याबद्दल प्रत्येकानं काळजी घेण्याची आता गरज आहे.
मुलांकडे देताना...
घरातली लहान मुलं अनेकदा मोबाइलवर गेम खेळण्यासाठी फोन हातात घेतात. त्यावेळी ते फोटो, व्हिडीओ पाहण्यासाठी गॅलरीमध्ये जातात. त्यामुळेच गॅलरीला पासवर्ड लॉक ठेवायला हवं. किंवा सतत गॅलरीमधले नको असलेले फोटो डिलीट करणं फायद्याचं ठरतं. लहान मुलांच्या हातात मोबाइल देताना खबरदारी घेणं गरजेचं आहे.
डेटा अपडेट ठेवा
मोबाइलमध्ये कोणते फोटो आणि व्हिडीओ ठेवणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या. त्याप्रमाणे मोबाइलमधला आवश्यक नसणारा डेटा साफ करा. मोबाइलमध्ये उगाच फाईल सेव्ह करून ठेवत जाऊ नका. आज अशी चांगली अॅप्स उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर मोबाइल हरवल्यानंतरही फोन फ्रीज करण्यासाठी करता येतो. मोबाइलमधला डेटा कायम अपडेट ठेवा. जंक क्लिअर करत राहा. असा कुणाच्याही मोबाईलमधला डेटा परस्पर व्हायरल करणं हा गुन्हाच आहे.
- मल्लिकार्जुन मल्ले, सायबर सुरक्षातज्ज्ञ
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट