रोज लागणारे आणि वर्षभर लागणारे अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांची साठवणूक स्वयंपाकघरात केली जाते. त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली नाही, तर ते खराब होतात. शिवाय, पावसाळ्यातील दमट आणि ओलसर हवेनं धान्य, खाद्यपदार्थ, भाज्या, फळं पटकन खराब होऊ शकतात. पुढील काही गोष्टी अंमलात आणल्यास तुम्ही त्यांची चांगल्याप्रकारे साठवणूक करू शकता.
धान्य, कडधान्यं, डाळी इ. निवडून स्वच्छ आणि कोरड्या कोठ्या किंवा डबे यांत भरून ठेवावीत. त्यात कडुनिंबाचा पाला, कीटकनाशक उदा. बोरिक पावडर लावून ठेवावे. म्हणजे त्याला कीड वा बुरशी लागत नाही व जास्त दिवस टिकतंही. गरज वाटल्यास वरचेवर याचे डबे तपासून पहावेत. वर्षभराचे मसाले, लोणची चिनीमातीच्या भांड्यात किंवा हवाबंद डब्यात हिंग वा मोठ्या मिठाचे खडे घालून सुती फडक्यानं बांधून ठेवावेत. आमसूल, चिंच, मीठ चिनीमातीच्या भांड्यात ठेवल्यास त्याला पाणी सुटत नाही. साखर, गूळ, सुकामेवा किंवा बिस्किटं यांसारखे पदार्थ हवाबंद डब्यात ठेवताना खाली टिप कागद, जाड पेपर ठेवून त्यावर ठेवावेत. अशा बरण्या आणि डबे हवेशीर व कोरड्या जागी ठेवाव्यात. पालेभाज्या खरेदी करताना भाजीची पानं गडद हिरवी, करकरीत असावीत. मूळ व देठाला माती, चिखल लागलेला नसावा. पालेभाजी आणल्यावर लगेच निवडून, धुवून, टिशू पेपर किंवा सुती कापडाने कोरडी करून फ्रिजमध्ये ठेवावी. पालेभाज्या शक्यतो लगेचच संपवाव्यात. शेंगासदृश भाज्या, मोड आलेली कडधान्यं, मिरची निवडून, धुवून आणि कोरडी करून हवाबंद डब्यात घालून फ्रिजमधे ठेवू शकता. वेळच्या वेळी फ्रीजही स्वच्छ करावा. कांदा, बटाटा, टोमॅटो, कोबी, आलं- लसूण कोरड्या व मोकळ्या जागी ठेवावेत. फळंसुद्धा धुवून कोरडी करून मोकळ्या जागी ठेवावीत. स्वयंपाक घरातील ओला व सुका कचरा यांची योग्य विल्हेवाट लावावी. जंतुनाशक वापरून फरशी वरचेवर साफ करावी. वापराचं आणि पिण्याचं पाणीही निर्जंतुक करून वापरावं. थोडक्यात गरज लागेल, त्याप्रमाणेच पावसाळ्यात पदार्थ, धान्य वा भाजीपाल्याचा साठा करावा आणि त्याची योग्य काळजी घेऊन स्वयंपाकघराचं आणि पर्यायानं कुटुंबाचंही आरोग्य राखावं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट