अनेक मुली अगदी टीनएजमध्येच प्रेमात पडतात. या वयामध्ये विचारप्रक्रिया तितकीशी विकसित झालेली नसते. त्यामुळे जोडीदाराबाबत घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात.
लहान वयात आकर्षण जास्त असतं आणि गांभीर्य कमी प्रमाणात असतं. प्रगल्भता वाढत जाते, तसतसं आपला प्रियकर आपल्यासाठी योग्य नाही, असं अनेकींना विविध प्रसंगांतून पटत जातं.अशा वेळी आपण त्याच्याशी ब्रेकअप केलं तर लोक काय म्हणतील, असा न्यूनगंड बाळगू नका. शेवटी तो आपल्या आयुष्याचा प्रश्न असतो.
ब्रेकअप करताना एकदम तडकाफडकी तोडून टाकणंही चुकीचं आहे. म्हणजे तू मला उद्यापासून भेटू नको किंवा यापुढे माझ्याशी बोलूच नको, असं सांगणंही चुकीचं ठरतं. अशा वेळी नात्यात एक अंतर तयार करायला हवं. एकमेकांना पडताळायला, विचार करायला वेळ द्यायला हवा. उदा. तो सोशल नेटवर्किंगबाबत किंवा आपल्या वागण्याबाबत बंधनं घालत असेल, तर त्याचा तो स्वभावच आहे की त्याला असुरक्षित वाटतं, हे जाणून घ्यावं.
थोडंसं अंतर ठेवलं तर काही वेळा नात्यातला खरेपणा जाणवतो किंवा तरीही ते नातं तोडण्याचा निर्णय कायम ठेवला, तर ते तोडताना दोघांनाही थोडा कमी त्रास होतो.
या मधल्या काळात प्री मॅरेज कौन्सिलरचा सल्ला घ्यायला हरकत नाही. तुम्ही एकमेकांना अुनरुप आहात, असं कौन्सिलरने सांगितलं की, तुम्ही पुढे जाऊ शकता. कारण तो निर्णय घेण्याची स्थिती खूप कठीण असते. आपण नेमका योग्य विचार करतोय ना, याबाबतच अनेक मुलींच्या मनात शंका असते.
आपल्या जोडीदाराकडून अपेक्षा काय आहेत. मिळालेला जोडीदार त्यासाठी योग्य आहे का? हे खरंतर प्रेमात पडायच्या आधीच जाणून घेतलेलं बरं. तो किती प्रेम, काळजी करतो, यापेक्षा तो इतरांशी कसं वागतो, हेही लक्षात घ्यावं.
त्याचे विचार, कल्पना, एकूणच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हे सगळं आपल्याशी जुळतंय का, हे पाहा. नाहीतर नात्यामध्ये नंतर अनेकदा बंधनं येतात. मग अनेकींना त्या नात्यातून बाहेर पडावंसं वाटतं.
प्रेमात पडण्याआधीच प्रियकर भावनाप्रधान आहे, अंतर्मुख आहे की बहिर्मुख हे आधीच समजून घ्या. ते माहिती असेल, तर पुढील वाद टाळता येतात.
एकूणच हा प्रश्न नाजूक आहे. तो नाजूक हातानीच सोडवायला हवा. तडकाफडकी कुठलं नातं तोडता येत नाही.
शब्दांकन - ऋतुजा सावंत
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट