शाळा-कॉलेजात जाण्यासाठी आता-आतापर्यंत जी समस्त मुलींची मैत्रिण होती, ती लेडिज सायकल आता अपवादानेच रस्त्यावर दिसते. लेडिज सायकलीच्या विक्रीत पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याचं विक्रेते सांगतात. बाइकची वाढलेली बाजारपेठ, तसंच युनिसेक्स सायकलींचं आकर्षण, ही त्यामागची कारणं.
पूर्वी आठवी-नववीतील वाढदिवसाची किंवा परीक्षेच्या निकालाची मुलींसाठी हमखास ठरलेली भेट म्हणजे सायकल होती. शाळेच्या शेवटच्या दोनेक वर्षात सायकल घेतल्यास कॉलेजपर्यंत ती कौतुकानं वापरली जायची. काही नोकरदार महिलाही कामावर जा-ये करण्यासाठी सायकली वापरत. आता एकीकडे गिअर असलेल्या, स्टायलिश, स्पोर्टी सायकल वापरण्याचं प्रमाण वाढतं आहे आणि दुसरीकडे पारंपरिक लेडिज सायकल विस्मरणात गेल्याचं चित्र आहे.
आताच्या मुलींना युनिसेक्स सायकलींचं आकर्षण आहे. जीन्स, पँट्स, लेगिन्सचा वापर वाढता असल्यानं या सायकली त्यांना वापरणं सोयीचंही ठरत आहे. या सायकलींचा लूक स्टायलिश आणि स्पोर्टी असल्यानं घरातील भाऊ-बहीण अशा दोन्ही भावंडांना ती वापरता येते.
विक्रेते सांगतात, चार वर्षांपूर्वी लेडिज सायकलचा खप १०० इतका असेल, तर आता तो दहावर आला आहे. इतकी तिची मागणी कमी झाली आहे. याचं कारण म्हणजे युनिसेक्स सायकलींचा लूक आणि सोय. कॉलेजच्या मुलींना स्टाइल हवी असते. त्याव्यतिरिक्त साहसी खेळांसाठीही मुलींचं अशा सायकली वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. लेडिज सायकल तुलनेनं स्वस्त असल्यानं आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या मुली आणि महिलांपुरतीच तिची मागणी टिकून आहे.
कॉलेजच्या मुला-मुलींचं बाइक वापरण्याचं प्रमाण वाढल्यामुळे सायकलींची मागणी कमी आहे. पण आता जाण्यायेण्यासाठी नव्हे तर चक्क व्यायामासाठी सायकली आवर्जून विकत घेतल्या जातात.
अपवाद असेही
आयआयटी पवई इथं मात्र जबरदस्त 'बायसिकल कल्चर' आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये विध्यार्थ्यांना सायकल वापरणं बंधनकारक आहे. कॅम्पस अफाट मोठा असल्यानं पायी फिरण्यापेक्षा विद्यार्थी सायकली वापरतात. कॅम्पसमध्ये बाइक चालवण्यासाठी वेगळा कॅम्पस परवाना लागतो. तो फक्त कर्मचाऱ्यांना मिळतो. इथल्या १६ हॉस्टेलमधील १० हजार विद्यार्थी सायकली वापरतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट