बारावीनंतर मी रुपारेल कॉलेजला प्रवेश घेतला. नवीन कॉलेज असल्यामुळे मित्र मैत्रिणी फारसे नव्हते. विषय सारखे असल्याने लेक्चरच्या निमित्ताने काही चेहरे ओळखीचे झाले होते. त्यातलाच एक प्रणव सुर्वे. आमचा दोघांचाही मराठी हा विषय होता. अभ्यासानिमित्त चर्चा करताना आमची ओळख झाली. पण फारसं बोलणं होत नव्हतं. कामापुरतं बोलणं व्हायचं तेवढंच. एक दिवस कॉलेजमध्ये चित्रकलेशी निगडीत काही स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. खूप मुलं त्या स्पर्धेसाठी आली होती. त्यात आम्ही दोघंही होतो. पेंटिंग करताना माझी सोन्याची अंगठी खराब होऊ नये म्हणून काढून मी ती पर्समध्ये ठेवली. पण ती पर्समध्ये न जाता खाली पडली आणि माझ्या घरी येईपर्यंत ते लक्षातही आलं नाही. घरी आल्यावर घाबरतच आईला सांगितलं. आईने तर अंगठी मिळण्याची आशाच सोडून दिली होती. काय करावं, कोणाला विचारावं तेच कळत नव्हतं. मग प्रणवला फोन केला. कारण माझ्याकडे फक्त त्याचाच नंबर होता. फारसा चांगला मित्र नसल्यामुळे विचारताना थोडं अवघडलेपण आलं होतं. पण हिंमत करून त्याला फोन केला. थोड्याच वेळात त्याने ती अंगठी शोधून काढली. फारशी मैत्री नसतानासुद्धा त्याने मला मदत केली होती. तो क्षण आमच्यातल्या चांगल्या मैत्रीला कारणीभूत ठरला असं म्हणता येईल. त्यानंतर मात्र आम्ही मागे वळून बघितलं नाही. आता तर खूप गोष्टी आम्ही एकमेकांना सांगतो, शिकवतो, बऱ्याच गोष्टींवर चर्चा करतो. रोज भेटणं किंवा बोलणं होतंच असं नाही, पण जेव्हा भेट होते तेव्हा खूप गोष्टी एकमेकांकडून शिकायला मिळत असतात. मग तो कधी एखादा अनुभव, माहिती शेअर करणं असो किंवा एकमेकांना मदत करणं आणि धीर देणं असो. आणि शेवटी नात्यात समजूतदारपणा असणं महत्वाचं असतं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट