आपण जिथे राहतो तिथल्या सगळ्यांशीच आपलं जमतं असं नाही. पण काही लोक असे असतात ज्यांच्याशी आपले विचार जरी जुळले नाहीत, तरी मैत्री मात्र खूप छान जुळून येऊ शकते. माझी आणि जसमितची मैत्री हे याचंच एक उत्तम उदाहरण असावं. सुरूवातीला एकमेकींशी न बोलणाऱ्या आम्ही दोघी नंतर मात्र खूप घट्ट मैत्रिणी झालो.
त्याचं झालं असं, की लहान असताना मी माझं जुनं घर सोडून नवीन ठिकाणी शिफ्ट झाले. आता नवीन ठिकाण म्हटलं, की नव्या ओळखी होतात. त्यातून नवे मित्र-मैत्रिणी मिळतात. राहायला आल्यानंतर नवीन बिल्डींगमधली बरीच मुलं माझ्या ओळखीची झाली. पण त्या सगळ्यात एका मुलीनं माझं विशेष लक्ष वेधून घेतलं. ती कायम शांत असायची. ती मुलगी म्हणजेच जसमीत. ती कधीही स्वतःहून येऊन माझ्याशी बोलली नाही. मला आधी वाटलं, की ही स्वतःला खूप शहाणी समजतेय, म्हणून ती माझ्याशी बोलत नसावी. पण नंतर हळूहळू माझ्या लक्षात आलं, की ती मुळातच शांत आहे. मग मी स्वतःहून जाऊन तिच्याशी जाऊन बोलू लागले. तिच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं, की ती खूप हुशार मुलगी आहे. हळूहळू आमच्या गप्पा वाढू लागल्या. तिच्याकडे खूप माहिती असायची. त्यामुळे आमच्यात अनेक विषयांवर चर्चा होत असे. आमच्यातली मैत्री वाढू लागली. खूप फिरणं, सिनेमाला जाणं, रात्री उशिरापर्यंत गच्चीत गप्पा मारत बसणं हे सगळं आम्ही खूप एन्जॉय करू लागलो. आज आमच्या मैत्रीला एक तप, म्हणजे बारा वर्ष पूर्ण झाली आहेत. आजही आम्हाला जेव्हा सुरूवातीचे दिवस आठवतात, तेव्हा आम्ही दोघीही खळखळून हसतो. खूप नशीबवान लोकांना असे चांगले मित्र-मैत्रिणी मिळतात. ज्यांना ते मिळाले आहेत त्यांनी ते आयुष्यभर जपले पाहिजेत असं मला वाटतं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट