Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

गेले करायचे राहून

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

आपल्याला आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या असतात. पण काही गोष्टी मात्र तीव्र इच्छा असूनही राहून जातात. त्या राहिलेल्या गोष्टी मग मोकळ्या वेळात मनात सलत राहतात.

मटाच्या अनेक वाचकांनीही अशा राहून गेलेल्या गोष्टींबद्दल आम्हाला कळवलं. यातील लता बागवे म्हणतात, खरं तर मला पत्रकारच व्हायचं होतं. पण त्या कोर्सची फी परवडणारी नसल्याने रडतच घरी आले. आज न्यूज चॅनल बघताना माझ्या त्या स्वप्नाची खूप आठवण येते. वैशाली मुळीकना नोकरी करायची इच्छा होती, पण संसाराच्या रामरगाड्यात त्या इतक्या गुंतून गेल्या की ती इच्छाही अपुरीच राहिली.

तेजल लिमजेला चित्रकलेत करिअर करायचं होतं. जे.जे. स्कूल ऑफ आर्टला जायचं होतं. पण नशिबाने तिला मास मीडियाच्या वाटेवर आणून सोडलं. कल्याणच्या अनुष्का गोलिपकर आज संस्कृतच्या शिक्षीका आहेत. स्वतःच्या क्षेत्रात कितीही अव्वल असल्या तरी आयएएस पूर्ण न केल्याची खंत त्यांच्या मनात आहेच. पण अनुष्कांनी आयएएस करण्यासाठी जीवाचं रान केलं. पण ती संधी हुकलीच.

तर कल्पना सांगळेची आई मूक-बधीर मुलांना शिकवते. त्यामुळे तिलाही या बारावीनंतर स्पेशल मुलांना शिकवण्यासाठी कोर्स करायची खूप इच्छा होती. मात्र, या ना त्या कारणाने तो कोर्स राहूनच गेला. सर्वसाधारण मुलांना कुणीही शिकवू शकते. पण, या विशेष मुलांना समजून घेऊन त्यांना शिकविण्याची जबाबदारी जास्त असते. यानिमित्ताने समाजसेवा करण्याची कल्पनाची इच्छा तिच्या मनातच राहिली. लहानपणापासून गाण्याची आवड असूनही दर्शना द्रविड यांचं गाणं सुटलं. गाण्याच्या दोन परीक्षा देऊनही दहावीच्या बागुलबुवाच्या भीतीने आठवीपासूनच त्यांचं गाणं बंद झालं. हीच हकीकत होती, विरारच्या मेधा कदम यांची. अनेकींना कुठली ना कुठली गोष्ट करायची राहिल्याची खंत असतेच. पण सायली वाघुळदे आणि शुभांगी औलकनी मात्र वेगळ्याच गोष्टीत खेद व्यक्त केला. सायलीच्या बाबांनी कायमच त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून तिच्यासाठी कायम वेळ काढला. पण ती मात्र त्यांच्यासाठी वेळ काढूच शकली नाही, हे तिला कायम सलत राहतं.

तर शुभांगी म्हणतात, मला सगळं काही मिळालं. पण माझ्या मनाला जपणं, आंजारणं गोंजारणं राहूनच गेलं. मी शरीराची काळजी घेतली पण मनाला काय वाटतं ते कधी ऐकलंच नाही. या मनाने अनेक अपमान पचवले, तडजोडी केल्या. पण मी मात्र त्याची जपणूक करण्यात कमी पडले. सगळ्यांना सांभाळून घेताघेता थोडं स्वतःलाही सांभाळलं असतं तर बरं झालं असतं.

मैत्रिणींनो, हे कराच!

प्राधान्यक्रम ठरवा, परिस्थिती स्वीकारा, आपण निर्णय का घेतला हे लक्षात ठेवा.

घडून गेलेल्या गोष्टी बदलता येत नसतात मात्र त्या सुधारता येतात.

आपल्याला काय हवे आहे याचा विचार करा.

उरलेल्या आयुष्यात राहून गेलेली गोष्ट करता येईल का, याचा विचार करा.

एखादी गोष्ट करण्याची आपली आता किती इच्छा उरली आहे याचा अंदाज घ्या.

अशावेळी काय करावं?

स्वतःलाच त्रास देणारं दुःख व्यक्त करत राहण्यापेक्षा महिलांनी हा संघर्ष निर्माण होण्याची गरज नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

त्या त्या वळी त्या त्या निर्णयाची गरज होती, हे स्वतःला पटवून देणं गरजेचं आहे. त्यामुळे हा संघर्ष कमी व्हायला मदत होऊ शकेल.

जगण्यामध्ये समतोल साधायला शिकायला हवं . समतोल म्हणजे बिनचूकता नव्हे. या बिनचूक जगण्याच्या हट्टापोटी दुःख पदरात येतं.

आयुष्य ही तारेवरची कसरत आहे. दैनंदिन जीवन जगताना आपण सरळ रेषेत चालू शकत नाही. त्यासाठी कधी या तर कधी त्या बाजूला झुकावेच लागते. कधीतरी एखादी गोष्ट चुकूही शकते. ते मान्य करायला शिकले पाहिजं. समतोल कसा साधायचा, परिस्थिती कशी हाताळायची हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते.

अनेक महिला स्वतःला क्षमा करू शकत नाहीत. मग आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टींचा विचार करताना मी हे का नाही करू शकले किंवा मी अशी कशी वागले हे विचार मनात येत राहतात. हे करू नका.

आपल्याला नेमकं काय हवंय, हे स्वतःला विचारा. सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तिथे, तेव्हा, हव्या त्या प्रमाणात मिळू शकत नाहीत, हे पटवून घ्या.

अनेकजणी आपलं दुःख दडपतात. हेसुद्धा वाईटच. अशा मनात साचलेल्या गोष्टींचा जास्त त्रास होतो. कधीकधी व्यक्त होण्यामुळेही त्रास कमी होऊ शकतो.

सतत एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटून घेत राहिलात तर त्याचे दुष्परिणामही दिसून येतात.

सतत खंत किंवा दुःख व्यक्त होत राहिले की अनेकींना शारीरिक व्याधींचा सामनाही करावा लागतो.

स्नायूदुखी, डोकेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, झोपेवर परिणाम अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>