कुलाबा कॉजवे मार्केट
गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ असलेलं हे हाय प्रोफाइल मार्केट काहींसाठी स्टेटस सिम्बॉल असलं, तरी ट्रेंडी आउटफिटसाठी तरुणाईचा हा हॉटस्पॉट आहे. फॅशनेबल अशा सर्व गोष्टी इथं मिळतात. रिगल थिएटरवरून सरळ खाली जाणारा, अर्थात शहीद भगतसिंग मार्ग म्हणजेच कुलाबा कॉजवे मार्केट. इथं सदानकदा गर्दीच असते. रस्त्याच्या दुतर्फा मार्केट आहे. एका बाजूला मोठ-मोठाली शोरूम्स व दुसऱ्या बाजूला स्टॉल्स असं या मार्केटचं स्वरूप. कपड्यांबरोबरच घड्याळं, स्टोन ज्वेलरी, मंकी ज्वेलरी इत्यादी वस्तू मिळतात.
कसं जाल? : दक्षिण मुंबई, रिगल सिनेमागृहाजवळ
काय मिळतं? : ज्वेलरी, शोभेच्या वस्तू, रंगीबेरंगी स्टोन, कपडे
लिंकिंग रोड
वांद्र्यातल्या लिंकिंग रोडला शॉपिंग करण्याची मजा काही और आहे. पारंपरिक, सांस्कृतिक, वेस्टर्न असं सगळं काही इथं उपलब्ध आहे. १०० रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू तुम्हाला इथं मिळतील. घासाघीस केल्याशिवाय मात्र खरेदी करू नये. शूज, बॅगा आणि फॅशनेबल कपडे खरेदीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. इथली खासियत म्हणजे 'लिंकिंग रोड शूज मार्केट'. इथं फॅशनेबल चपला, बूट कमी किंमतीत मिळतील. मग ते लोफर्स असो वा बॅलेरिनाज, सिक्वीन हिल असो वा वेजेस. त्याचबरोबर अपटूडेट आउटफिट्सचे ही इथं पुष्कळ पर्याय उपलब्ध आहेत.
कसं जाल? : वांद्रे स्टेशनहून रिक्षानं पाच मिनिटांच्या अंतरावर.
काय मिळतं : शूज, बॅगा, कपडे, अॅक्सेसरीज आणि बरंच काही.
फॅशन स्ट्रीट
फॅशनच्या बाबतीत नेहमीच 'अप टू डेट' राहणारं मुंबईतलं ठिकाण म्हणजे 'फॅशन स्ट्रीट'. इथं फुटपाथवर साधारण दीडशेहून अधिक स्टॉल्स आहेत. चर्चगेट रेल्वेस्टेशनपासून सुरू होणारी हा 'फॅशन स्ट्रीट', थेट मेट्रो सिनेमापर्यंत जाते. मुलांचे-मुलींचे कपडे, विविध प्रकारची फॅशनेबल जॅकेट्स ही इथं आहेत. सिनेकलाकारांनी घातलेले गॉगल्स, बूट, चप्पल, जर्किन, जॅकेट, जीन्स, फॅन्सी ड्रेस सर्व काही तुम्हाला इथं मिळेल. लहान मुलांसाठीही विविध फॅशनचे तयार कपडे मिळतात. टीशर्ट, जीन्स, शर्ट, चप्पल, बूट, सुटकेस, लेदर बेल्ट आदींच्या खरेदीसाठी फॅशन स्ट्रीट मार्केट प्रसिद्ध आहे.
कसं जाल? : चर्चगेट स्टेशनपासून दोन मिनिटांच्या अंतरावर
काय मिळतं? : मुलं-मुली सर्वांसाठी कपडे, चप्पल, जॅकेट्स
क्रॉफर्ड मार्केट
क्रॉफर्ड मार्केट हे फार पूर्वीपासूनच खरेदीसाठी अनेकांचं आकर्षण बनलेलं आहे. देश-विदेशांतून अनेक पर्यटकही या मार्केटमध्ये खरेदीसाठी येतात. या मार्केटमध्ये सुका मेवा, चॉकलेट्स, चॉकलेट मोल्ड्स, टॉयलेटरीज, लहान मुलांची खेळणी, कॉस्मेटिक्स, नॉव्हेल्टी आयटेम्स, पॅकेजिंग/पॅकिंगचं सामान (गिफ्ट रॅपर्स, पिशव्या, एन्व्हलप्स, गोंडे, पार्सलचं सामान),कागदाच्या डिश, पेले, गिफ्ट आर्टिकल्स, परफ्युम्स आदी गोष्टींची दुकानं आहेत. त्याचबरोबर देशी-परदेशी फळंही इथं मिळतात. लखनवी कपडे, खादी कपडे, लहान मुलांचे तयार कपडे, विविध ब्रँडच्या कॉस्मेटिक्स वस्तू, पडदे/सोफ्याची कापडं असं बरंच काही इथं उपलब्ध आहे.
कसं जाल? : सीएसटी स्टेशनपासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर (मुंबई पोलीस मुख्यालयाच्या समोर)
काय मिळतं : विविध प्रकारच्या वस्तू, सुका मेवा, फळं, फुलं, भाज्या, कापड आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू.
चोर बाजार
चोर बाजाराला अनेक वर्षांचा इतिहास आहे. जुन्य, प्राचीन वस्तूंसाठी हा बाजार प्रसिद्ध आहे. खूप दुर्मीळ वस्तू तुम्हाला इथं मिळतील. एरव्ही कुठेही न मिळणारी वस्तू, चोर बाजारात नक्की मिळणार असं बोललं जातं. मुळात याच नाव 'शोर बाजार' असं आहे. मात्र ब्रिटीशांच्या राजवटीत त्याचा उच्चार चोर बाजार असा होऊ लागला. पुढे चोरीचा मालही या बाजारात येऊन विकला जाऊ लागला. इथल्या एका मिनी मार्केट नावाच्या दुकानात जुन्या चित्रपटांचे पोस्टर्स विकत मिळतात. व्हिक्टोरिया राणीच्या काळातलं फर्निचर आणि गाड्यांचे सुटे भागदेखील इथं मिळतील. मुंबईत येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांसाठी हे एक आकर्षण केंद्र आहे.
कसं जाल? : दक्षिण मुंबईतल्या भेंडीबाजार जवळ हा चोर बाजार आहे.
काय मिळतं : जुन्या, प्राचीन वस्तू
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट