माझी मैत्रीण दुर्गा... ती तिसरीत असताना आमच्या शाळेत आली होती. एक दिवस आम्हाला बाईंनी "माझी मैत्रीण / मित्र " असा निबंध लिहायला सांगितला होता. सगळे निबंध लिहायला लागले. तर तिनं मला विचारलं, की 'तुझ्या आवडीचा रंग कोणता?' मी गोंधळले. ही वर्गात आलेली नवीन मुलगी मला असा प्रश्न का विचारते? असा प्रश्न मला पडला. मी तिला उत्तर दिलं 'लाल'. सगळ्यांचे निबंध लिहून झाले.
त्यानंतर जेव्हा तिची निबंध वाचण्याची वेळ आली तेव्हा तिनं त्यात माझं नाव घेतलं होतं. त्यात माझ्या आवडीनिवडींविषयी लिहिलं होतं. मला त्यावेळी झालेला आनंद आजही आठवतो. तेव्हापासून माझी आणि दुर्गाची मैत्री सुरु झाली असं म्हणता येईल. आम्ही एकमेकींशी खूप गप्पा मारतो. असा एकही दिवस गेला नाही की माझी आणि दुर्गाची काही ना काही किरकोळ गोष्टींवरून भांडणं झाली नाहीत. ती खूप स्पष्टवक्ती आहे, नीटनेटकी आहे आणि हुशार आहे. आम्ही दोघीजणी एकमेकींवर खूप प्रेम करतो. एकमेकींच्या वाढदिवसाला सगळ्यात छान गिफ्ट काय असेल ते देण्याचं प्रयत्न करत असतो. तिच्याकडून मला नेहमीच काहीतरी वेगळं असं गिफ्ट मिळत आलेलं आहे. म्हणूनच या वर्षी मी तिला असं काही गिफ्ट द्यायचं ठरवलंय जे तिच्या नेहमी स्मरणात राहील. येत्या ४ ऑक्टोबरला दुर्गाचा वाढदिवस आहे. म्हणुनच मी 'मुंटा'तल्या 'तेरी मेरी यारी' या सदरात आमच्या मैत्रीची गोष्ट पाठवायचं ठरवलं. माझ्या प्रिय दुर्गाला मी अशाप्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. आणि मला हे गिफ्ट देण्याची संधी मिळाली तर मी 'मुंटा'ची ऋणी राहिन.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट