दिवाळी पहाटला आपण सगळेच नव्या कपड्यांत शाइनिंग मारत असतो. सतत कपडे, दागिने ठीक आहेत ना पाहत असतो. पण तो मात्र गळ्यातल्या कॅमेऱ्याने आपल्याला टिपतो. आपले फोटो काढतो तरी अजून काढ ना... किंवा माझा फोटो का नाही काढला? म्हणून आपला ओरडा खात असतो.... तोच तो, आपला सगळ्यांचा लाडका ग्रूपमधला फोटोग्राफर मित्र.
सणासुदीच्या या काळात स्वत:च्या क्रशपासून ते मैत्रिणींच्या घोळक्यांपर्यंत आणि ग्रूप्सपासून ते 'दादा एक फोटो क्लिक कर ना' असे म्हटल्यावर अनोळखी लोकांनाही फोटोत कैद करणारा फोटोग्राफर कायम उपेक्षितच असतो. फोटोग्राफीचं वेड त्याच्यात उपजतच असतं. त्यामुळे भल्या पहाटे भरजरी कपड्यांवर ते कॅमेऱ्याचं लोढणं सांभाळत तो फिरत असतो. मग ग्रूपमधल्या सर्वांचे फेसबुक डीपीपासून कव्हर फोटोपर्यंत वेगवगेळ्या पोजमध्ये फोटो काढून झाल्यावरच याची सुटका होते.
फक्त फोटो काढून याची सुटका नसते. तर त्यानंतर ते प्रत्येकाला पाठवावेही लागतात. नाहीतर सोशल मीडियावर सगळ्यांना टॅग करण्याचं दिव्यही करावं लागतं. अशावेळी मात्र फोटोग्राफर दोस्ताचा भाव वाढतो. फेसबुक अपडेट आणि लाइक्ससाठी आसुसलेले लोक या फोटोग्राफर्सची विनवणी करतात.
हल्ली अनेकांच्या मोबाइलमध्ये भन्नाट कॅमेरे आलेले असतीलही पण तरीही ग्रूपमधल्या या हौशी फोटोग्राफरची क्रेझ कमी झालेली नाहीच. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत एक नक्की करा, ग्रूपमधल्या आपल्या त्या हक्काच्या फोटोग्राफरला आठवणीन थँक यू तरी म्हणाच!
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट