दिवाळीला शुभेच्छांसोबत स्नेहींना काहीतरी वस्तू भेट म्हणून द्यायची असा ट्रेंड आता चांगलाच रुळला आहे. आप्तजनांना फराळाचे पदार्थ देण्यापेक्षा आपली आठवण म्हणून काहीतरी वस्तू द्यावी हा यामागचा मुख्य उद्देश. हे गिफ्ट देण्यासाठी ड्रायफ्रूट आणि चॉकलेट बॉक्सपासून चांदीच्या नाण्यांपर्यंत विविध गोष्टींना नाशिककरांचे प्राधान्य मिळत आहे.
ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यातही बाजारात जाऊन खरेदी करण्याला नाशिककरांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच मिठाई, सराफी पेढ्या यासह विविध गिफ्ट गॅलरीज, मॉल्स याठिकाणी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
ड्रायफ्रूट बॉक्स
ड्रायफ्रूट्स तेच असले तरी त्याच्या पॅकिंगमध्ये मात्र मोठी व्हरायटी आज पाहायला मिळते. फिश स्टाइल, स्क्वेअर, राउंड शेप अशा आकारत हे बॉक्सेस पॅक करून उपलब्ध आहेत. २०० रूपयांपासून पुढे यांची किंमत असून यामध्ये बदाम, मनुके, काजू, अंजीर यांच्या मिक्स बॉक्सेसला जास्त मागणी आहे.
चॉकलेट मिठाई
यंदा चॉकलेट मिठाईला जास्त मागणी असल्याचे दिसत आहे. ब्राऊन पेपरमध्ये रॅप केलेल्या चॉकलेट बॉक्सेसला पसंती मिळत आहे. या चॉकलेट बॉक्समध्ये चॉकलेट मिठाईही पॅक केलेली असल्याने कॉम्बो मिठाई यंदा आकर्षण ठरली आहे. १५० रूपयांपासून पुढे सर्वत्र ही मिठाई उपलब्ध आहे.
चांदीचे नाणे
गणपती, लक्ष्मी, कुबेर या चांदीच्या नाण्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या नाण्यांची मागणी पाहता अनेक सराफ व्यावसायिकांकडे याचे स्वतंत्र काऊंटर सुरू करण्यात आले आहे. नातेवाईकांमध्ये गिफ्ट स्वरुपात ही नाणी देण्याचा ट्रेंड यंदा अधिक दिसून येत आहे. लक्ष्मी आणि गणपती एकत्र असलेल्या नाण्यांना अधिक मागणी आहे. शहरातील सर्व सराफी दुकानांमध्ये तसेच काही गिफ्ट शॉप्समध्ये ही नाणी न २०० रूपयांपासून पुढे उपलब्ध आहेत.
हटके भेट
दिवाळीच्या भेटवस्तूत अँटिक वस्तू भेट देण्याकडे झुकता कल आहे. शो पीस म्हणून लहान आकारातील डायनिंग टेबल, बाइक्स, क्रोकरी सेट अशा अनेक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. याचसोबत विविध प्रकारच्या फ्रेम्सना दरवर्षीप्रमाणे यंदाही मागणी आहेच. भाऊबीज आणि पाडव्यानिमित्तही विविध प्रकारच्या गिफ्ट्स उपलब्ध झाल्या आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट