'आज लक्ष्मीपूजनाचा काय बेत आहे? बासुंदी की गुलाबजाम?', 'यंदा पाडव्याला श्रीखंड-पुरीच', 'गुलाबजाम दसऱ्यालाच केले होते. आता भाऊबीजेला खीर करणार आहे. भावाला खूप आवडते'... ही वाक्यं अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत कानी पडत होती. सणासुदीला घरी गोडधोडाची जंगी मेजवानी असायचीच. काही वर्षांत मात्र चित्र पालटलं असून, दिवाळीच्या दिवसांत चक्क हॉटेलमध्ये जेवण्याचं प्रमाण वाढत आहे.
सणाच्या दिवशी घराला कुलूप लावून बाहेर पडण्याचा विचारही आपल्यापैकी काही जण करू शकत नाहीत. किंबहुना अनेक घरांमध्ये आजही हे रूचणार नाही. घरात साग्रसंगीत पूजा-अर्चा करून, घर सजवून, छान छान कपडे घालून, गोडाचा स्वयंपाक करून, नैवेद्य दाखवून पंगत मांडून जेवणं...हे झालं सेलिब्रेशन. दिवाळीच्या दिवसांत तर संध्याकाळी दारात, खिडक्यांमध्ये, गॅलरीत पणत्या लावणं, रांगोळी काढलेल्या अंगणात फटाके फोडणं आणि नंतर पक्वानांवर ताव मारणं, हा नित्यक्रम होता जणू. लक्ष्मीपूजन किंवा पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी घर बंद करून जेवायला बाहेर जाणं ही कल्पनाच न रुचणारी होती. मात्र, गेल्या काही दिवसांतला ट्रेंड पाहता दसरा-दिवाळीसारखे सणही हॉटेलमध्ये साजरे करण्याचं प्रमाण वाढतं आहे.
यामागे कॉमन सुट्टी हे मोठं कारण असल्याचं कुटुंबीयांच्या बोलण्यातून दिसतं. लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला सामान्यतः सगळ्याच नोकरदारांना सुट्टी असते. पाडवा हा नवरा-बायकोचं नातं उजळवणारा सण. या दिवशी नवऱ्याकडून बायकोला छानसं गिफ्टही दिलं जातं. दोघांना सुट्टी असल्यास हा दिवस एकत्र बाहेर साजरा करून बायकोला किचनमधल्या कामातूनही सुट्टी देण्याचा विचार यामागे दिसतो.
भाऊबीज हा भावंडांना एकत्र आणणारा सण. जवळचे भाऊ-बहिण तसेच त्यांचे कुटुंबीय असा गोतावळा या दिवशी जमतो. अशा वेळी कोणा एकाच्या घरी स्वयंपाकाचा घाट घालून त्या गृहिणीचं काम वाढवण्यापेक्षा हॉटेलमध्ये जेवण्यास पसंती दिली जाते. घरी भाऊबीजेचा ओवाळणीचा कार्यक्रम झाला, की हॉटेलमध्ये छोटंसं फॅमिली गेटदुगेदर होत असल्याचं दिसतं.
याविषयी 'श्रेयस' डायनिंग हॉलचे व्यवस्थापक अश्विन मुळ्ये म्हणाले, 'दोन-तीन कुटुंबांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा भाऊबीजेसारखा सण असल्यास हॉटेलिंग वाढते. कोणा एकाच्या घरी स्वयंपाक करण्यापेक्षा सगळ्यांनीच बाहेर जाऊन एकमेकांना अधिक वेळ देण्याचा हेतू यामागे असावा. त्यामुळे पाडवा, भाऊबीजेलाही ग्राहकांची हॉटेलमध्ये गर्दी असते.'
सणासुदीच्या दिवसांतही हॉटेलिंग वाढते आहे, यास दुजोरा देताना दुर्वांकुर डायनिंग हॉलचे व्यवस्थापक नितीन कुडले म्हणाले, 'सणाच्या दिवशी हॉटेलमधील गर्दी आटेल, असं वाटू शकतं. मात्र, गर्दी वाढत असते. ग्राहकांचा हा प्रतिसाद लक्षात घेऊन आम्ही आठवडाभर दिवाळी स्पेशल मेन्यूही देतो.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट