मुलींवर, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्या नेहमी प्रसिद्ध होत असतात. कायदे कडक झाले, सुरक्षेच्या उपाययोजना केल्याचं कितीही बोललं गेलं तरी हे प्रकार अद्याप कमी होताना दिसत नाहीत. म्हणूनच याविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी विल्सन कॉलेजच्या चार तरुणी पुढे सरसावल्या आहेत. त्यासाठी 'द सर्कल' या नावानं या मुलींनी कॉलेजमध्ये एक महिला मंच सुरू केला आहे. अदरीजा सेन, पुजा नायर, मिताली अधिकारी, नादिया सेहगल अशी या मुलींची नावं आहेत.
'द सर्कल' हा मंच प्रामुख्यानं महिला अत्याचारांविरोधात कार्यरत झालाय. शिवाय, लहान मुलं तसंच अगदी पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधातही तो काम करतो. ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेला हा मंच दर शुक्रवारी कॉलेजमध्ये भरतो. विद्यार्थी आपले अनुभव यावेळी शेअर करतात. विनयभंग, छेडछाड, लैंगिक शोषण या विषयांवर इकडे चर्चा होते. या चर्चेत मुली, मुलं मोठ्या संख्येनं सहभागी होतात. शिक्षकही यावेळी मुलांना मार्गदर्शन करतात.
'अनेकदा लैंगिक शोषणाबाबत खुलेपणानं बोललं जात नाही. पीडीत मुलीपुरतंच ते मर्यादित राहतं. लैंगिक शोषणाबाबत बोलू नये असा आपल्या समाजात अलिखित नियम आहे. हे आम्हाला खोडून काढायचं आहे. यासाठीच आमचा हा मंच आहे', असं नादिया सेहगल सांगते. विल्सनबरोबरच मुंबईतल्या इतर कॉलेजांमध्येदेखील 'द सर्कल'चा प्रसार व्हावा तसेच अधिकाधिक लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचावा यासाठी फेसबुक पेजदेखील तयार करण्यात आलं आहे.
आज अनेक महिला मंच कार्यरत आहेत. पण कॉलेज स्तरावर 'महिला मंच' सुरू करण्यामागचा आमचा हाच हेतू आहे की, अधिकाधिक तरुणवर्ग यात सहभागी होऊ शकेल. कारण शेवटी आम्ही तरुणच देशाचे उद्याचे नागरिक आहोत. - नादिया, पूजा, मिताली, अदरिजा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट