मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
सुपर्णा शुक्ल, कॉलेज क्लब रिपोर्टर muntainbox@gmail.com हल्ली सगळीकडे इकोफ्रेंडलीचा बोलबाला दिसतो. प्रत्येक गोष्ट पर्यावरणपूरक कशी होईल, याचा जो तो विचार करत असतो. तोच विचार करून कोकीला देशपांडे ही तरुणी पेपरपासून फर्निचर बनवण्याचा भन्नाट उद्योग करते आहे. तिची ही भरारी वेगळीही आहे आणि कौतुकास्पदही. आपल्याकडे अनेक प्रकारची रद्दी येत असते. पेपरांची विशिष्ट पद्धतीने गुंडाळी करून त्यापासून आराम खुर्ची, टेबल, टिपॉयसारखं फर्निचर बनवण्याचा उद्योग कोकीला करते. मूळची आर्किटेक असलेल्या कोकीलाने एकदा सहज पेपरचा रोल करून त्यापासून बास्केट बनवलं. तेव्हा तिला लक्षात आलं की, साधासा पेपरही बरंच वजन पेलू शकतो. सुरुवातीला तिने प्लॅस्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून कागदी पिशव्या बनवल्या. त्यानंतर दणकट आणि टिकाऊ पेपरपासून फर्निचर बनवण्याचा विचार केला. यासाठी कोणत्याही प्रकारचा गम किंवा स्टॅपलर पिना न वापरता ते बनवण्याचं तंत्र तिने शिकून घेतलं. त्यानंतर ती थांबली नाही. बास्केट, वेगवेगळ्या पद्धतीच्या खुर्च्या आणि इतरही फर्निचर बनवण्यास तिने सुरुवात केली. या फर्निचरचं वैशिष्ट्यं म्हणजे हे बनवण्यासाठी कोणत्याही यंत्राचा वापर केला जात नाही. हे पेपर हाताने अगदी कुशलतेने गुंडाळले जातात. तसंच हे सर्व फर्निचर टाकाऊ पेपरपासून बनवलं जातं. हा व्यवसाय सुरु झाल्यानंतर कोकीलाने 'पेपर वर्क्स' नावाने हे फर्निचर विकण्यास सुरूवात केली. जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचण्यासाठी फेसबुक पेजवरून संपर्क साधण्यास सुरूवात केली. आज तिचा हा व्यवसाय मोठा झाला आहे. तिच्या हाताखाली काही महिलाही काम करतात. या सगळ्यामध्ये तिला आधी तिच्या आई-वडिलांची आणि नंतर नवर्याचीही खूप मदत होते आहे.