muntainbox@gmail.com
स्वतःसाठी एखाद्या परिपूर्ण सुगंधाची निवड करणं हे तसं कठीणच! तज्ज्ञांच्या मते, आपलं व्यक्तिमत्त्व खुलवणारा परफ्युम निवडायचा असेल, तर सुगंधांच्या फ्रेश, फ्लोरल, ओरिएंटल, वूड्स या गटांपैकी ज्याच्याशी जुळवून घेता येईल, त्याचीच निवड करावी.
आवडणारे सुगंध ः तुम्हाला ज्याचा सुगंध सर्वाधिक आवडतो, जो तुमच्या मनात खोलवर जाऊन रुजलाय, त्याच सुगंधाचा परफ्युम सोबत बाळगा. म्हणजे एखादं विशिष्ट फूल, पान, फळ तत्सम नैसर्गिक सुगंध किंवा चंदनाचा, ओल्या मातीचा किंवा अगदी तान्ह्या बाळाच्या अंगाला येणारा पावडर, दुधाची साय यांचा वास आवडत असेल, तर तो लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या वासाशी मिळताजुळता वास तुम्हाला परफ्युमच्या ब्रँडमध्ये शोधता येईल आणि तुमचा वेगळा असा खास सुगंध तुम्ही निवडू शकाल.
खास व्यक्तीसाठी भेट म्हणून परफ्युम द्यायचा झाल्यास ः ज्या व्यक्तीसाठी तुम्ही परफ्युम घेणार असाल, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व एकदा नीट पारखून घ्या. त्या व्यक्तीला तुम्ही व्यवस्थित ओळखत असाल, तर तुम्हाला त्यांना साजेसा सुगंध देता येईल; कारण प्रत्येक व्यक्तिमत्त्व एक वेगळा सुगंध घेऊन येतं.
आईसाठी परफ्युम घेत असाल, तर तिच्या मायाळू व्यक्तिमत्त्वाला तेजाची झालर देऊन तिचा आत्मविश्वास खुलवण्यासाठी व्हॅनिला आणि व्हाइट मस्क सुगंधातला परफ्युम निवडा.
तुमच्या लाडक्या बाबांसाठी कार्डामॉम, लव्हेंडर आणि सिनामॉन या ताज्या प्रकारांपैकी एखादा परफ्युम निवडा. त्यांच्या दिवसभराच्या धावपळीत त्यामुळे जास्त थकवा जाणवणार नाही.
तुमच्या खट्याळ मैत्रिणीसाठी रोझ आणि ब्लॅककरंट सुगंधाचा परफ्युम निवडा. तिच्या व्यक्तिमत्त्वाला तो आणखीच खुलवेल.
तुमच्या अतिउत्साही आणि भटक्या स्वभावाच्या मित्राला द्यायला मात्र लेमन, सेडार, ओक मॉस आणि मॅन्डरीन यांपैकी परफ्युम निवडा.
त्वचेसाठी योग्य ः परफ्युम निवडताना तो आधी स्वतःच्या त्वचेवर फवारून बघा आणि त्याच्या परिणामांबाबत अंदाज घ्या. त्याचबरोबर स्वतःची त्वचा नेमकी कुठल्या प्रकारची आहे, हेही जाणून घ्या. त्वचा कोरडी असल्यास त्यावर परफ्युमचा सुगंध दीर्घकाळ टिकू शकणार नाही. परफ्युमचा सुगंध दीर्घकाळ टिकावा असं वाटत असेल, तर आधी त्वचेवर मॉइश्चरायझर लावा. त्यामुळे परफ्युममधली द्रव्यं आणि क्रीम यांच्या मिलाफाने आपण सुगंधाने सतत बहरत राहू.
परफ्युम वापरताना ः बदलत्या शारीरिक तापमानाप्रमाणे परफ्युम त्वचेवर परिणाम करतात. परफ्युमचा सुगंध अधिकाधिक वेळ येण्यासाठी तो शरीरावर अशा ठिकाणी फवारा, की तो दीर्घकाळ टिकेल आणि इतरांनाही जाणवेल. मनगट, काख, मानेच्या आणि गुडघ्यांच्या मागे तो फवारा. केसांमधून हलकेच परफ्युम वापरल्यावरही त्याचा सुगंध दीर्घकाळ राहतो आणि आपलं व्यक्तिमत्त्व आणखीनच सुगंधित करतो.
(संकलन ः गार्गी पेठे)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट