आई-वडील ऑफिसात, मुलं आपापल्या शाळा-कॉलेजांमध्ये व्यग्र असं अनेक मुंबईकरांचं रुटिन असतं. त्यात आता सोशल मीडियाची भर पडल्यानं एकमेकांसाठी वेळ मिळणं अवघड होतं. अशा अनेक कुटुंबांनी मॅरेथॉनच्या निमित्तानं एकत्र येऊन 'गेट सेट गो' म्हणायचं ठरवलंय. स्मार्टफोनवरील 'टेम्पल रन'मध्ये धावणारी ही मंडळी आता प्रत्यक्ष धावणार आहेत. 'आई-वडील-मुलं', 'नवरा-बायको' 'वडील-मुलगा', 'आई-मुलगी', 'भाऊ-बहीण' अशा जोड्याही यंदाच्या मॅरेथॉनमध्ये पळताना दिसतील.
फिटनेसबाबत निर्माण झालेल्या जागरुकतेमुळे हे चित्र दिसत असल्याचं सांगितलं जातं. हेमंत आणि दनय कामदार ही वडील-मुलाची जोडी सांगते, की 'कोणत्याही सामाजिक कारणासाठी (सोशल कॉज) नव्हे तर स्वतःसाठी आम्ही धावणार आहोत. धावणं हा असा व्यायाम आहे, ज्यामुळे तुमचे सर्व अवयव कार्यक्षम राहतात. स्वतःला फिट ठेवणं हा आमचा हेतू आहे. सध्या मॅरेथॉनसाठी आमची तयारी सुरू असून रोज सकाळी आम्ही दोघं धावायला जातो.'
बेंगळूरूचे राहुल-प्रतिभा-नवीन हे आई-वडील आणि मुलगा असं कुटुंब, अहमदाबादची समीर आणि हेमल शहा, इंदूरचे नरेश-निर्मला बागनी ही जोडी, नवी मुंबईचे सुकला आणि ईशानी रॉय या माय-लेकी यांच्यासारखी अनेक उदाहरणं आहेत. संदीप आणि प्राची कोठारी हे जोडपं म्हणालं, की 'धावण्यात एक वेगळाच
आनंद असतो. स्वतःला शिस्त लागते, स्वतःच स्वतःलाच आव्हान देऊन बघता येतं. मॅरेथॉनच्या प्रॅक्टिसमुळे स्वतःला वेळसुद्धा देता येतो. नाती अधिक घट्ट होतात, सकारात्मक ऊर्जा जाणवते.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट