पूजा राणे माझी सर्वात जिवाभावाची मैत्रिण म्हणजे अर्चना. तिची आणि माझी भेट शाळेत सातवीत असताना झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत ती माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे. शाळा आणि क्लासला आम्ही एकत्र जात असू. आम्ही सतत एकत्र असायचो. आमची मैत्री शाळेत खूप प्रसिद्ध होती. शाळा सुटल्यानंतर खालेली चिंच, बोरं यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळते. तिला भेटून मैत्रीचा अर्थ समजला. माझ्या सवयी, मला काय आवडतं सगळं तिला ठाऊक आहे. आमच्या दोघींच्या हातातल्या स्टीलच्या बांगड्या ही आमची ओळख होती. शाळेतून बाहेर पडलो तेव्हा दोघींना वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये प्रवेश मिळाला. मात्र त्यामुळे आम्ही दोघी ऐकमेकांपासून कधीच दुरावलो नाही. अर्चना खूप समंजस आहे. क्लासला सुट्टी मिळाली किंवा रविवारी मी तिच्या घरीच रहायला जायचे. मग रात्रभर आमच्या गप्पा रंगायच्या. आम्हाला दोघींना चमचम हा गोड पदार्थ खूप आवडतो. दररोज क्लास सुटल्यानंतर चमचम खाणं हा आमचा दिनक्रम ठरलेला. त्यानंतर आमच्या घरच्यांनी आम्हा दोघींना स्थळ बघण्यास सुरूवात केली. तिचं लग्न होऊन एक वर्ष झालं तरी, आमची दोस्ती आजही तशीच टिकून आहे. आधीसारखचं आताही आम्ही भेटतो, खूप गप्पा मारतो आणि एकमेकींना आमचं सुख-दु:खही शेअर करतो. अर्चना माझी जवळची मैत्रिण असली तर, माझ्या मोठ्या बहीणीसारखी आहे. आम्ही आमच्या मैत्रीच्या कितीतरी आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवल्या आहेत. अर्चना जर माझ्या आयुष्यात नसती तर मला जीवनाचा अर्थ कधीच समजला नसता. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आमची मैत्री अशीच राहिल हे नक्की.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट