तुमच्या जवळच्या व्यक्तिला मनातल्या भावना जरा हटके, म्हणजे म्युझिकल स्टाइलनं सांगायच्या आहेत? मग तुमच्यासाठी आलंय 'म्युझिकल मेसेंजर'. तरुण संगीतकार सुखदा भावे-दाबकेनं हा आगळावेगळा प्रयोग केला आहे...
तुमच्या जवळच्या व्यक्तिचा वाढदिवस आहे. त्या निमित्तानं त्याला शुभेच्छा देण्यासाठी एखादं गाणं किंवा जिंगल तयार केली आणि ती त्याच्यापर्यंत पोहोचवली तर? समोरची व्यक्ती खूश होणार याची फुल टू गॅरंटी. हीच कल्पना संगीतकार सुखदा भावे-दाबकेच्या मनात आली आणि सुरू झालं 'म्युझिकल मेसेंजर'. याच्या माध्यमातून कुणालाही आपल्या आवडत्या व्यक्तिला संगीतमय शुभेच्छा देता येणार आहेत. आपल्या आवडत्या व्यक्तिला एखाद्या खास प्रसंगी छानसं गिफ्ट काय द्यावं, शुभेच्छा कशा द्याव्यात असा प्रश्न आपल्याला पडतो. या मेसेंजरच्या माध्यमातून आपल्या मनात असलेल्या समोरच्या व्यक्तीबद्दलच्या भावना संगीताच्या माध्यमातून व्यक्त करता येणार आहेत. सुखदानं त्यासाठी आपली स्वतःची संस्था शुभसूर क्रिएशन्सच्या माध्यमातून ही कल्पना आणली आहे. सुखदा स्वतः संगीत क्षेत्रात काम करत असून, तिचे काही अल्बम्स आले आहेत. असं काहीतरी वेगळं डोक्यात आल्यानंतर तिचा नवरा पराग दाबके आणि तिनं या संकल्पनेवर काम केलं. गाण्याच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या भावना कोणालाही खुश करू शकतात त्याचबरोबर त्यामध्ये एक प्रकारचा पर्सनल टच जोडला जातो म्हणूनच ही संगीतमय भेट लोकांना आवडू शकते असं त्यांना वाटलं. म्युझिकल मेसेंजरचं वैशिष्टय म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसापासून ते बड्या श्रीमंत व्यक्तीपर्यंत कुणीही याचा उपयोग करून घेऊ शकतो. शुभसूर क्रिएशन्सच्या www.shubhasurcreations.com वेबसाइटच्या माध्यमातून म्युझिकल मेसेंजरसाठी संपर्क साधता येणार आहे. कशा द्यायच्या शुभेच्छा? म्युझिकल मेसेंजर या सुविधेचा वापर करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जर कोणासाठी म्युझिकल मेसेज करायचा असेल, तर त्याने शुभसूर क्रिएशन्सशी संपर्क साधायचा आहे. मग त्या व्यक्तीशी बोलून एक छानशी जिंगल तयार केली जाईल. त्या जिंगलमध्ये एखादी जरी गोष्ट त्या व्यक्तीने स्वतः केलेली असेल. उदा. शब्द, चाल किंवा स्वतःच्या आवाज तर या म्युझिकल मेसेंजरला वेगळाच आणि खूप स्पेशल असा पर्सनल टचही देता येईल. गिफ्ट ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकजण कधी ना कधी कोणा ना कोणाला देतोच. कधी ती वस्तू असते, कधी फुलं तर कधी ग्रीटिंग. या गिफ्टला मनातली भावना जोडली तर त्याचे महत्त्व अधिक वाढेल याच विचारातून म्युझिकल मेसेंजर ही संकल्पना प्रत्यक्षात आली. - सुखदा भावे-दाबके (संगीतकार)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट