पाश्चात्य देशांमध्ये सध्या धूम आहे ती हॅलोवीनची. त्यांच्याकडचा हा ट्रेंड मुंबईतही दिसून येऊ लागलाय. कॉलेजं, कॉर्पोरेट्समध्ये हॅलोवीन पार्ट्या सुरू झाल्या आहेत…
धमाल-मस्तीचा मूड चटकन टिपणाऱ्या मुंबईकरांनी पाश्चात्यांचा हॅलोवीनचा ट्रेंड उचलायला सुरुवात केली आहे. नकारात्मक गोष्टींची भीती जावी, हा हॅलोवीन साजरा करण्यामागचा मूळ उद्देश असतो. त्यानुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडेही अनेक ठिकाणी हॅलोवीननिमित्त पार्ट्यांचं आयोजन करण्यात येतंय.
कॉलेजांमध्ये पार्ट्यांचं आयोजन
यंदा बऱ्याच कॉलेजांमध्ये हॅलोवीन पार्टी ठेवण्यात आली आहे. वेगवेगळ्या थीम्स आणि त्याबरोबरच खाद्यपदार्थांची रेलचेल या पार्ट्यांमध्ये बघायला मिळणार आहे. कॉलेजच्या कॅम्पसमध्येच अनेक गेम्स आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर हॅलोवीन ट्रेंडींग
हॅलोवीन पार्टीसाठी काय वेशभूषा कराल इथपासून मित्र-मैत्रिणींना काय गिफ्ट द्याल याची माहिती देणारे अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एवढंच नाही, तर मित्र-मैत्रिणींनी कसं घाबरवलं याचे किस्से किंवा हॅलोवीनच्या आठवणी सांगणारे व्हिडीओज, पार्टीचे लाइव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर हिट आहेत. ट्विटरवर #halloween सध्या ट्रेंडींग आहे.
खाण्याची रेलचेल
हॅलोवीनच्या दिवसात अनेक नवनवीन खाद्यपदार्थ बनवले जातात. विशेषत: या दिवसांमध्ये गोड खाण्यास जास्त प्राधान्य दिलं जातं. हॅलोवीनसाठी केक कसा बनवाल किंवा अनेक गोड पदार्थ्यांच्या रेसिपीजची माहिती देणारे व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडींग आहेत. हॅलोवीननिमित्त खूप वेगळे पदार्थ, मस्त आकारातले केक्स, पेस्ट्रीज मुंबईच्या काही हॉटेलांमध्ये ठेवण्यात आले आहेत.
बॉलिवूड व्हीलन थीम
‘शोले’ चित्रपटातला गब्बर असो की ‘ओमकारा’मधला लंगडा त्यागी, हे व्हिलन्स प्रेक्षकांना आवडले. नेमकी हीच व्हिलन्सची थीम यंदा हॅलोवीनमध्ये पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या बहुतेक ठिकाणी पार्टीसाठी यंदा बॉलीवूड व्हिलन अशी थीम ठेवण्यात आली आहे. यासाठी लागणारी वेशभूषा कुलाबा कॉजवे, वांद्रे लिकिंग रोड, हिल रोड इथे उपलब्ध आहे. व्हिलन अधिक प्रभावीपणे साकारण्यासाठी मेकअप कसा करावा? याबद्दलचे व्हिडीओही सध्या ट्रेंडींग आहेत.
कॉर्पोरेटमध्ये धूम
यंदा कॉर्पोरेट क्षेत्रात हॅलोवीनचा उत्साह अधिक पाहायला मिळतोय. कर्मचाऱ्यांचे आपसातले संबंध अधिक घट्ट व्हावेत या दृष्टीने यंदा अनेक कंपन्यांमध्ये हॅलोवीन पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी हटके थीम्सपासून विविध गेम्स, नाच-गाणी या सगळ्याची रेलचेल या कॉर्पोरेट पार्ट्यांमध्ये असणार आहे.
- निकेत करजगी, कॉर्पोरेट प्लॅनर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट