पाल्याच्या मोठं होण्याच्या प्रक्रियेतले सगळे टप्पे फक्त कुटुंबातील सदस्यांपुरतेच न ठेवता ते सोशल मीडियावर प्रदर्शित केले जातात. याचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम आहेत.
सुमीत व्यास आणि निधी सिंग यांच्या ‘परमनंट रूममेट्स’ या गाजलेल्या वेबसीरिजमध्ये निधीला तिच्या पहिल्या प्रेगन्सीचा अल्ट्रसाउंड रिपोर्ट चक्क फ्रेम करून घरातल्या भिंतीवर लावायचा होता. हा भाग पाहाणाऱ्या प्रेक्षकांच्या भुवया तिची ही इच्छा पाहून उंचावल्या होत्या. हाच सध्याचा ट्रेंड असून, सोनोग्राफीचा पहिला रिपोर्ट, डिजिटल फुटप्रिंट, तान्हुल्याचा पहिलं हसू, पहिला दात, पालथं पडणं, रांगणं, पहिलं पाऊल टाकणं, अंघोळ असे विविध टप्पे सोशल मीडियावर शेअर करण्याकडे पालकांचा कल आहे.
सोशल मीडियानं लोकांना चांगलीच भुरळ घातली आहे. आपल्या आयुष्यातली प्रत्येक घटना, मग ती सुखद असो वा दु:खद फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अशा विविध साइटवर लगेचच शेअर करण्यात सगळेच आघाडीवर असतात. पाल्याच्या जडणघडणीतले, त्याच्या मोठं होण्याच्या प्रक्रियेतले सगळे टप्पे खासगीत किंवा फक्त कुटुंबातील सदस्यांपुरतंच न ठेवता ते सोशल मीडियावर प्रदर्शित केले जात आहेत. मात्र, अशा पद्धतीनं स्वतःला प्रदर्शित (ओव्हरएक्सपोझ) करणं मोठं झाल्यानंतर काही मुलांसाठी ओशाळवाणं वाटू शकतं, अशी शक्यताही बाल मानसोपचारतज्ज्ञांना व्यक्त केली आहे.
मूल आपल्या डोळ्यासमोर मोठं होतंय हे प्रत्येक पालकासाठी कौतुकास्पद असतं. त्या कौतुकातून होणाऱ्या आनंदातूनच असं शेअरिंग होतं असतं. ही संकल्पना इंग्रजीमध्ये ‘शॅरेटिंग’ या नावानं प्रसिद्ध असून, याचा शब्दशः अर्थ म्हणजे, मुलांशी संबंधित प्रत्येक गोष्ट सांगण्यासाठी सोशल मीडियाचा अतिवापर करणं. या संकल्पनेचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही. त्यामुळे पालकांनी या दोन्ही बाबी पडताळून किंवा त्यांचा योग्य समतोल साधून शेअरिंग करावं. ते मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हिताचं ठरेल, असं सांगितलं जातं.
परदेशातलं चित्र
परदेशात शॅरेटिंगचं प्रमाण खूप असून, ते पाल्याचं डिजिटल किडनॅपिंग किंवा त्याच्याशी संबंधित माहिती डाटा किडनॅपिंगसाठी कारणीभूत ठरत आहे. म्हणजे पालकांनी पाल्याच्या टाकलेल्या माहितीचा (नाव, लिंग, जन्मस्थळ, जन्मखूण इत्यादी) गैरवापर होणं. ही माहिती चोरून बनावट लायसन्स काढल्याच्या अनेक घटना परदेशात घडल्या आहेत.
तज्ज्ञ काय म्हणतात...
अनेकदा पालकांना वाटतं, की मुलांवर आपला पूर्ण हक्क आहे. मात्र, मुलं जशी जशी मोठी होऊ लागतात तेव्हा त्यांना पालकांचं असं आधिकारवाणीनं वागणं आवडत नाही आणि ते आक्रमक किंवा बंडखोर बनतात. यामुळे दोघांमध्ये नात्याचा बंध तयार होत नाही आणि एकमेकांचा विश्वासही संपादित होत नाही. या सगळ्याचा संबंध शॅरेटिंगशीही आहे. म्हणजे मुलांना कळू लागल्यानंतर त्यांची प्रत्येक सवय, गोष्ट आपल्या आई-वडिलांनी सोशल करणं त्यांना आवडत नाही. पालक त्यांचं मत, भावना महत्त्वाच्या न मानता आपलंच म्हणणं खरं करतात, असं मानसोपचारतज्ज्ञ सीमा हिंगोंर्ने यांनी सांगितलं.
या पार्श्वभूमीवर पालकांनी असं शेअरिंग करणं मुलांना अपमानास्पद किंवा लज्जास्पद वाटू शकतं, असंही तज्ज्ञांचं निरीक्षण आहे. त्यामुळे जाणत्या वयात त्यांच्या परवानगीनं फोटो, गोष्टी, शाळा-कॉलेजचे निकाल अशा गोष्टी शेअर करण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट