लग्नावेळी आपल्या अत्यंत जवळचे नातेवाईक, मित्र मैत्रिणींनी उपस्थित असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण, प्रत्येकवेळी हे शक्य होईलच याची शाश्वती नसते. बऱ्याचदा लग्नाचे आडमुठे मुहूर्त, वीकडेजमध्ये आलेली लग्न, समारंभ स्थळांची लांबची अंतरं यामुळे मनात असूनही अनेकांना लग्नस्थळी पोहोचता येत नाही. परदेशातल्या लोकांना तर केवळ शुभेच्छा देण्यावरच समाधान मानावं लागतं. यावर भन्नाट सोल्यूशन मिळालंय ते टेक्नोलॉजीमुळे.
फेसबुक, यु-ट्यूब, स्काइपच्या माध्यामातून लग्नातले प्रसंग यंदा सोशल होताना दिसतायंत. लग्नसराईमध्ये लग्न 'लाइव्ह' करण्याचा ट्रेंड दिल्ली पाठोपाठ आता मुंबईतही हिट होतोय.
एका आयटी कंपनीत नोकरी करणारी वैदेही लेले सांगते, ‘माझी काही मित्रमंडळी परदेशात राहतात. माझ्या लग्नाला येणं त्यांना शक्य होणार नाहीय. पण लग्नाच्यावेळी स्काइप, व्हिडिओ कॉलिंगच्याद्वारे ते माझ्या लग्नात हजेरी लावणार आहेत.' काहीतरी ‘हट के’ ट्राय करून लग्नाचे क्षण 'यादगार' करण्याचे प्रयत्न येत्या लग्नसराईमध्ये दिसणार आहेत. सोशल मीडियावरच्या व्हर्च्युअल मित्रांबरोबर लग्नातले क्षण व्हिडिओच्या माध्यामातून शेअर करण्याचा ट्रेंड सध्या ‘इन’ आहे. ३ ते ५ मिनिटांच्या 'वेडिंग ट्रेलर' शूटसाठी पन्नास हजार ते दीड लाखापर्यंत हौशी लोक खर्च करतात. लग्नाच्या शूटिंगशिवाय एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी जाऊन प्रि-वेडींग शूटचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. सकाळपासून रात्रीपर्यंत ऑनलाइन असणारी तरूणाई यंदा लग्नातही ऑनलाइन असणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट