मित्र- मैत्रिणींना घरी पोहोचल्याचा मेसेज करायला सांगता का?
1.काहीतरीच काय, मी त्यांना घरापर्यंत पोहोचवायला जाते.
2.मी त्यांना घरी पोहोचल्याचा मेसेज करायला सांगते.
3.कधी कधी... ते स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहेत.
मित्र- मैत्रिणी तुमच्या घरी राहायला आल्यानंतर काय परिस्थिती असते?
1.माझं घर नीटनेटकं ठेवलेलं असतं. फ्रीजमध्ये खायला आणून ठेवलेलं असतं. झोपण्याची नीट व्यवस्था केलेली असते. टाइमपाससाठी गेम्स आणून ठेवलेले असतात.
2.घर नीटनेटकं असतं; पण बाकी सामान ज्याचं-त्यानं आणावं. बेड माझा आहे; पण मी शेअर करते.
3.जेवणखाणं बाहेरच. झोपायला माझ्या घरी.
तुमच्या मैत्रिणीचं किंवा मित्राचं ब्रेकअप झालंय. तुम्ही त्यांचं कसं सांत्वन करता?
1.सगळेजण माझा सल्ला घ्यायला येतात. मी त्यांना पाहिजे तेवढा वेळ देते आणि मदत करते. असं मी आतापर्यंत खूपवेळा केलंय.
2.मी त्यांचं सगळं ऐकून घेते आणि त्यांना त्यांच्या आवडत्या ठिकाणी घेऊन जाते, त्यांना मूड चांगला करण्यासाठी शक्य ते करते आणि बोलून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते.
3.उगाच रडत कशाला बसायचं. उठा... कामाला लागा, यातून बाहेर पडा.
तुमच्या बेस्ट फ्रेंडचा वाढदिवस आहे. तुम्ही कशी तयारी करता?
1.घरी बनवलेला केक, ग्रीटिंग कार्ड, सजावट, भेटवस्तू... सगळं काही साग्रसंगीत
2.तिला अक्सेसरी आवडतात आणि तिच्यासाठी तेच घेऊन ठेवलंय.
3.मी एखाद्या दिवशी तिला ट्रीट देईन. मी आणलेली भेटवस्तू तिला आवडली नाही, तर काय?
सहलीला निघत असताना सोबत काय-काय घेऊन जाता?
1.सहलीची आखणी मी केलीय म्हटल्यावर सगळं काही साग्रसंगीत असणारच. स्नॅक्सपासून गोळ्या- बिस्किटांपर्यंत, डोकेदुखीच्या गोळीपासून स्वेटरचा जादा जोड घेऊन ठेवण्यापर्यंत आणि लागलंच तर एखादं रेडी टु मिक्सचं पाकीटसुद्धा घेतलंय. कानातल्याची फिरकी हरवली असेल, तर ती सुद्धा आहे बरं का.
2.सहलीला गेल्यावर जे काही लागणार आहे ते सगळं घेतलंय आणि जास्तीचं कुणाला लागलं तर त्याचीही सोय केली आहे.
3.मी सकाळी लवकर उठून स्टेशनवर पोहोचलीय एवढं पुरेसं नाही का? अजून काय पाहिजे?
तुमची मैत्रीण सीटबेल्टशिवाय गाडी चालवत असेल, तर काय करता?
1.छे छे.. तिला असं ड्रायव्हिंग करून देण्याचा प्रश्नच येत नाही. मीच तिला बेल्ट लावून दिला मग.
2.तसं ठीक आहे. मी सांगेन तिला बेल्ट लाव म्हणून. गाडीचा वेग फार नसेल, तर चालतं.
3.ओह, कारचा अलार्म वाजेपर्यंत माझं कधीच त्याकडे लक्ष जात नाही
या प्रश्नांच्या उत्तरावरून ठरेल, की तुम्ही कसे आहात
सर्वाधिक अ – तुम्ही ग्रुपच्या निरूपा रॉय आहात! म्हणजे तुम्ही खूप काळजी घेणाऱ्या आहात. तुम्ही मित्र- मैत्रिणींच्या घरी गेल्यावर त्यांची खोली आवरता, त्यांचे फाटलेले शर्ट शिवून देता, त्यांच्या मुलाखतीची तयारी करून घेता आणि पार्टी संपल्यावरही त्यांची काळजी घ्यायला विसरत नाही. तुम्ही मित्रमैत्रिणींसाठी प्रत्येक गरजेवेळेस लागणारी व्यक्ती आहात आणि त्यांना अगदी प्रत्येक गोष्टीवर तुमच्याकडून मत हवं असतं. तुम्ही पालनपोषण करण्यात एक्स्पर्ट आहात आणि ‘मदर्स डे’ला सगळेजण तुम्हाला नक्की शुभेच्छा देतील! सावध व्हा, नाहीतर अतिरेक व्हायचा.
सर्वाधिक आ – तुम्ही तशा निवांत आहात. मित्रमैत्रिणींची तुम्हाला काळजी असते; पण त्यांना त्यांची स्पेसही तुम्ही देता आणि याचा अर्थ कुठं थांबायचं हे तुम्हाला कळतं. तुम्ही विचारी आहात; पण अतिरेकी नाही. उगाच पायात पाय घालण्यापेक्षा वेळीच मागे होणं तुम्हाला जमतं.
सर्वाधिक ई – तुम्ही स्वतःला सांभाळू शकताय, हेच खूप आहे. तुम्ही काळजीमुक्त आहात आणि कोणतीच गोष्ट गांभीर्यानं घेत नाही. एखाद्या विषयावर गंभीर सल्ला घेण्यासाठी तुमचे मित्र मैत्रिणी कधीच तुमच्याकडे येत नाही. कित्येकदा ग्रुपलाच तुमची काळजी घ्यावी लागते. हां... तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींची काळजीच नसते, असं नाही, तर सगळं आपोआप घडत जातं असं तुम्हाला वाटतं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट