मित्रानं केलं काम
पूर्वी सहदिग्दर्शक म्हणून काम करणारा माझा एक मित्र आहे अमोल पणशीकर. मी त्याच्याकडे कधीही हक्कानं मदत मागू शकतो. पाच-सहा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. एका मोठ्या जाहिरात कंपनीसोबत मी एक मोठी जाहिरात केली होती. त्यासाठी बराच वेळ दिला होता. चांगले पैसे मिळणार होते. पण काम झाल्यानंतर सहा महिने उलटले तरी ती कंपनी काही पैसे देण्याचं नाव घेईना. कोऑर्डिनेटरनं हात झटकले. अशा वेळी मला अमोलची आठवण झाली. घडला प्रकार त्याच्या कानांवर घातला. कंपनी मोठी असल्यानं त्यांच्याशी भांडणं सोपं नव्हतं. त्यानं या गोष्टीत लक्ष घातलं. खूप प्रयत्न केले. त्यानंतर आठ महिन्यांनी मला ते पैसे मिळू शकले. फक्त पैसे म्हणून नव्हे, पण त्या काळात त्यानं माझ्यासाठी केलेले प्रयत्न पाहून हा माझा खरा मित्र असल्याचं पुन्हा एकदा पटलं.
उमेश कामत,
मदतीला धावला
अनेकांना हे माहित नसेल, पण पुष्कराज (चिरपुटकर) हा माझा जवळचा मित्र आहे. आम्ही छान गप्पा मारतो, त्याच्याशी मी खूप काही शेअर करते. एकच छोटासा प्रसंग सांगते. तेव्हा मी मुंबईत एकटीच राहायचे. एकदा ‘लग्नबंबाळ’ नाटकाचा माझा प्रयोग पार्ल्यात होता. मी प्रयोगात असताना माझ्या घरमालकाचा चार-पाच वेळा फोन येऊन गेला. प्रयोग संपल्यावर त्यांना फोन केला तेव्हा कळलं की घरातला नळ उघडा राहिला होता. आणि घरामध्ये पूर्ण तळ साचलं होतं. मी घरी पोहोचेपर्यंत एक-दीड तास गेला असता. मी खूप अस्वस्थ झाले होते. शेवटी मी पुष्कराजला फोन करून त्याला घरी पोहोचायला सांगितलं. त्यानं मला धीर दिला. तो तातडीनं घरी पोहोचला आणि त्यानं घराची साफसफाई करायलाही सुरुवात केली.
श्रुती मराठे
आम्ही थ्री मस्केटिअर्स
कामानिमित्त माझं सतत मुंबई-पुणे असं सतत येणं-जाणं सुरू असतं. मुंबईतल्या माझ्या रूममेट्स, म्हणजे श्रद्धा आणि सायली यांच्याशी माझी घट्ट मैत्री झालीय. एक माझा डावा हात आहे तर एक उजवा असं म्हटलं तरी हरकत नाही. अनेक कठीण प्रसंगी दोघींनी मला खूप मदत केली आहे. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी असतील. नेटवर्क नसल्यास ऐनवेळी मेल पाठवणं किंवा एटीएमचा पासवर्ड विसरले तर तो लक्षात आणून देणं अशा कामांमध्ये मला श्रद्धाची खूप मदत होते. तर सायली म्हणजे आमची अन्नपूर्णा आहे. घरात दूध, फळं, भाज्या असं सगळं भरून ती उत्तम स्वयंपाक करून ती आम्हाला खाऊ घालते. आम्ही थ्री मस्केटिअर्स आहोत असं म्हणायला हरकत नाही.
- प्राजक्ता
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट