नातं तोडणं घाईचं
अनेकदा नातं संपवण्याचा निर्णय तडकाफडकी घेतला जातो. बऱ्याचदा डोकं शांत झाल्यावर, तसंच मुलांचा विचार केल्यावर दाम्पत्याकडून घटस्फोटाबाबत पुनर्विचार केला जातो. सहा महिन्यांच्या कालावधीत संसार टिकवण्याचाच निर्णय बऱ्याचदा घेतला जातो. आठ दिवसांत नातं तोडणं घाईचं ठरू शकतं. म्हणूनच मध्यममार्ग म्हणून किमान तीन महिने तरी एकत्र राहून बघायला हवं. कुटुंबाच्या दृष्टीनं कुणीच हा निर्णय स्वागतार्ह म्हणणार नाही. अखेर शेवटचा निर्णय हा त्या दाम्पत्याचाच असेल.
- अश्विनी कासार, अभिनेत्री-वकील
समुपदेशनासाठी वेळ हवा
घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर किमान सहा महिन्यांचा कालावधी असायला हवा असं मला वाटतं. कारण या दरम्यान होणारं समुपदेशन फार महत्त्वाचं असतं. अनेकदा या कालावधीत जोडप्यांना हॅपी रियलायझेशन होतं. संसार टिकवण्यासाठी तडजोडी करणं आवश्यक असतं. पण हीच गोष्ट जेननेक्स्टला अवघड वाटते. अशानं नाती तुटण्याचं प्रमाण वाढू शकतं, ज्यामुळे सगळ्यांनाच त्रास होऊ शकतो. तडकाफडकी ८ दिवसांत घटस्फोट घेण्याचा निर्णय शक्यतो टाळायला हवा. नात्याला थोडासा वेळ देणं गरजेचं आहे.
- नेहा साटम-राणे, प्रोफेसर-विद्यार्थी समुपदेशक
घातक निर्णय
हा निर्णय एक प्रकारे चांगला आहे. कारण वेगळं व्हायचा निर्णय पक्का झाला असेल तर ही प्रक्रिया झटपट होईल. तर दुसरीकडे मात्र हे वाईट आहे. हा निर्णय समाजासाठी भविष्यात घातक ठरू शकतो. लग्न म्हणजे आयुष्यभर साथ निभावणं असतं. आठ दिवसांत ते मोडता येणार असेल तर त्याकडे टाइमपास म्हणून बघितलं जाईल. 'करून बघूया, नाही जमलं तर वेगळे होऊया' असा दृष्टिकोन यातून निर्माण होईल, जो चुकीचा ठरेल.
केदार पाटणकर, नोकरी
स्वागतार्ह, पण…
हा निर्णय अशा जोडप्यांसाठी स्वागतार्ह आहे ज्यांना खरंच घटस्फोट घेण्याची गरज आहे. मात्र यामुळे कुटुंबव्यवस्थेवर उलटा परिणाम होऊ नये एवढंच. कारण आठवड्याभरात घटस्फोट मिळणार असेल, तर लोकं हे गृहित धरु लागतील. त्यांना आयुष्यातल्या या महत्त्वाच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करायला वेळ मिळणार नाही. जो आधी सहा महिन्यांत मिळायचा. अर्थात दोघंही राजी असतील तर हा निर्णय योग्यच आहे असं म्हणता येईल.
तेजस महामुनी, वकील
आठवडाभरात तोडणं अशक्य
मला तरी हा भयंकर निर्णय वाटतोय. ज्याप्रमाणे लग्न ही वेळ घेऊन करण्याची गोष्ट आहे, त्याचप्रमाणे केवळ आठवड्याभरात हे नातं तोडता येऊ शकत नाही. नात्यात कुणाची चूक झाली तर त्यात काही सुधारणा होऊ शकते का याबाबत विचार करण्यासाठी वेळ लागतो. सहा महिन्यांच्या कालावधीत नातं कसं वाचू शकेल यावर भर दिला जातो. जे आता शक्य होणार नाही. मुळात, पटलं नाही तर आठ दिवसांत घटस्फोट घेता येईल या मानसिकतेनं जर लग्न करणार असाल, तर त्यापेक्षा ते करूच नये.
- अनिता दाते, अभिनेत्री
चांगला निर्णय
आठ दिवसांत घटस्फोट मिळण्याचा निर्णय चांगलाच आहे. कारण या आधी १० ते १५ वर्षे रखडलेली प्रकरणं कोर्टात प्रलंबित असायची. जर अशा प्रकारच्या प्रकरणांचा आठ दिवसात निकाल लागणार असेल तर हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे.
- डॉ. विजय दाभोळकर, प्रिन्सिपल, गुरुनानक कॉलेज
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट