कॉलेज विश्व म्हणजे खरं तर विविध कलागुणांना वाव देणारं भांडार असतं. इथे प्रत्येक जण आपल्या कला जोपासत असतो, स्वतःला घडवत असतो. अशाच कलागुणांची खाण असलेल्या उरणच्या जाई ठाणेकरची ही यशोगाथा.
'आई, माऊली आता पंढरी सोडून कुठे नाही जाणार, कारण भक्तीची ती वीट आता मी बनेन' हे वाक्य तिच्या तोंडून निघालं अन् टाळ्यांचा कडकडाट सभागृहात घुमला. सलग दुसऱ्या वर्षीही उत्कृष्ट नायिकेचा किताब तीच पटकावणार हे निच्छित झालं. कॉलेज विश्व म्हणजे खरं तर विविध कलागुणांना वाव देणारं भांडार असतं. इथे प्रत्येक जण आपल्या कला जोपासत असतो, स्वतःला घडवत असतो. अशाच कलागुणांची खाण असलेल्या उरणच्या जाई ठाणेकरची ही यशोगाथा.
जाई म्हणजे एकाच वेळी अनेक कलांमध्ये यशस्वी असण्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. यावर्षी जूनमध्ये शिमला येथे पार पडलेल्या ऑल इंडीया आर्टीस्ट असोशिएशनच्या एकांकीका स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी जाईने उत्कृष्ट नायिकेचा किताब पटकावला आहे. तसेच फेब्रुवारीमध्ये ओरिसा येथे ऑल इंडीया कल्चरल मेजर पोर्ट यांच्यातर्फे झालेल्या स्पर्धेत ही तिने उत्कृष्ट नायिका किताब व तबला वादनात प्रथम क्रमांक मिळवला होता. सध्या जाई तबला वादनात विशारद प्रथम करत असून नोव्हेंबर महिन्यात तिचं विशारद पूर्ण होईल. तबल्यावर ज्या कुशलतेने तिचे हात फिरतात तिच कुशलता तिच्या नृत्यात आहे. तिने भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यशैलीचे शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घेतले आहे.
रंगमंच गाजवणारी ही अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीतही पाय रोवताना दिसतेय. 'मॅटर', 'ऑन ड्युटी २४ तास', 'प्रियतमा' अशा चित्रपटात तिने छोट्या भूमिका साकारल्या आहेत. आगामी येणाऱ्या वारसा चित्रपटात ही तिच्या अभिनयाची झलक आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक स्रीने स्वंरक्षणाबद्दल जागरूक असायसा हवं असं मत असणारी जाई स्वतः कराटे ब्लॅक बेल्ट आहे. त्याचबरोबर ती स्केटिंगची ही आवड जोपासते आहे. 'एक किंवा दोन क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यापेक्षा जमेल त्या क्षेत्राचा व्यासंग जपून त्यात प्राविण्य मिळवण्यास काय हरकत आहे. तुमच्यात ती क्षमता असेल तर तुम्ही एकाहून जास्त क्षेत्रात नक्कीच पुढे येऊ शकता', असं तिने 'मुंटा'शी बोलताना सांगितलं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट