घरची परिस्थिती बेताची असली की अनेक विद्यार्थ्यांना नाईलाजानं शिक्षण सोडून देण्याची वेळ येते. पण काही जिद्दी मुलं स्वस्थ बसत नाहीत आणि मेहनतीनं ती आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करत राहतात. जोगेश्वरीमध्ये एका छोट्याश्या खोलीत राहणारा सर्वेश सावंत हा मुलगाही असंच एक उदाहरण. स्वतःमध्ये असलेल्या कलांच्या बळावर तो काम करतोय. घरखर्चाला हातभार लावत आपलं शिक्षणही पूर्ण करतोय.
रंगकामाची आवड असणारा सर्वेश गणपतीच्या कारखान्यात जाऊ लागला. तिथं गणेशमूर्ती रंगवण्यात तो रमायचा. मूर्ती रंगवण्याची कला त्यानं चांगलीच आत्मसात करून घेतली आहे. त्याचबरोबर डायमंड वर्क, मूर्तीला सोवळं नेसवणं यांसारख्या आणखी काही कलाही त्यानं शिकून घेतल्या आहेत. गणेशोत्सवानंतर नवरात्रीची लगबग सुरू होते. तेव्हा अशा वेळी देवींची वेशभूषा करण्याचेही काम तो गेल्या तीन वर्षांपासून करतो आहे. या कामांमधून मिळणाऱ्या पैशांतून तो स्वतःच्या शिक्षणाचा खर्च तर उचलतोच. तसंच घरखर्चालाही हातभार लावतो. शिवाय, फावल्या वेळेत तो अनेक कार्यक्रमांमध्ये बेंजोही वाजवतो. अशा पद्धतीनं काम करत-करत त्यानं आपलं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.
साऊंड इंजिनीअर बनण्याचं स्वप्न पाहत असलेल्या सर्वेशला वडिलांचं तुटपुंजं उत्पन्न, महागाईचा बोजा यामुळे तिथं प्रवेश घेता आला नाही. परंतु आपलं शिक्षण थांबू नये म्हणून त्यानं मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. वडील कामानिमित्त दिवसभर बाहेर असल्यानं घरातली कामंही तो करत असतो.
काम करत शिकण्याचा मार्ग कठीण असला तरी अशक्य नाही. आई-वडिलांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्या मला पूर्ण करायच्या आहेत. कारण माझे आई-वडिल माझ्या शिक्षणासाठी खूप काबाडकष्ट करत असतात.
- सर्वेश सावंत
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट