टीव्ही मालिकांसोबतच वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. अनोख्या विषयावर आधारित वेब सीरिजचं परीक्षण 'वेब टेस्ट' या नव्या सदरांतर्गत देणार आहोत.
'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'दिल चाहता है' यांसारखे चित्रपट पाहिल्यानंतर भटकंतीप्रेमी तरुणाईला फिरायला जाण्यासाठी आणखी ऊर्जा मिळाली. त्यानंतर जर तरुणाईला रोडट्रिपला जावंसं वाटत असेल तर ते 'द ट्रिप' या वेबसीरिजमुळेच! 'बिंदास'वरच्या या सीरिजमध्ये भारत ते थायलंड अशी रोडट्रिप दाखवण्यात आली आहे. यामध्ये दाखवण्यात आलेली लोकेशन्स कमाल आहेत. त्यातही एका एपिसोडमध्ये ड्रोननं करण्यात आलेलं शूट अफलातून देखावा दाखवणारं आहे.
चि सौ का अनन्या, योगा शिक्षक संजना, संगीतकार शोनाली आणि पत्रकार नाझीया अशा या चार मैत्रिणींची ही धमाल ट्रिप म्हणता येईल. या चौघी आजच्या तरुणींचं प्रतिनिधित्व करतात. मल्लिका दुवानं नाझीया हे पात्र खूप छान पद्धतीनं साकारलं आहे. सीरिजमधील अनन्याचं लग्न होणार असल्यानं बॅचलर्स पार्टीसारखी ही बॅचलर्स ट्रिप आखली जाते. या चौघींना बघितल्यावर स्वतःच्या बेस्ट फ्रेंड्ससोबत केलेली धमाल मस्ती आठवते. त्यांना गप्पा मारताना बघून स्वतःही शिक्षकांबद्दल किंवा मुलांबद्दल केलेली गॉसिप्स असं खूप काही डोळ्यांसमोर उभं राहतं... अगदी तेव्हाच्या भांडणांसाहित! तसंच या वेबसीरिजची सगळ्यात उजवी बाजू म्हणजे निवडण्यात आलेले कॉस्च्युम्स. विशेषतः लिसा हेडनच्या स्टाईल स्टेटमेंटचा उल्लेख करावासा वाटतो. तसंच या वेबसीरिजचं टायटल ट्रॅकही खूप कॅची आहे. एकदा तरी या अनोख्या 'ट्रिप'चा अनुभव जरुर घ्यायला हवा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट