सँडविच शंकरपाळी
एका सॉसपॅनमध्ये गुळाचा पाक तयार करा आणि त्यात गव्हाचं पीठ मिसळून घ्या. त्याचा एक गोळा करा. नंतर त्या गोळ्याला उकडून घ्या आणि त्याचे चार छोटे-छोटे गोळे करून पोळीप्रमाणे लाटून घ्या. चार पोळ्या लाटून झाल्यावर दोन पोळ्यांवर चॉकलेटचं मिश्रण काळजीपूर्वक पसरवा. दुसऱ्या दोन पोळ्यांनी मिश्रण लावलेल्या पोळ्यांना झाकून घ्या. पिझ्झा कटरच्या सहाय्याने आपल्या आवडीच्या आकारात पोळ्यांचे काप करा. मंद आचेवर तूपात फ्राय करा आणि अशाप्रकारे सँडविच शंकरपाळी तयार. चॉकलेट सिरपच्या ऐवजी आवडीनुसार कोणतंही मिश्रण घालून सँडविच शंकरपाळी बनवू शकता.
चटपटीत चंद्रकोर
पहिल्यांदा रवा, मैदा, ओवा, मिरपूड, आणि मीठ एकत्र करावं. नंतर त्यात मोहन घालून ढवळावं व एकत्र झाल्यास पाण्याने मध्यम मळून ३० ते ४० मिनिटे झाकून ठेवावं. नंतर पीठ व्यवस्थित कुटून घ्यावं. पिठाचे दोन भाग करून पोळी लाटावी. छोटी वाटी घेऊन चंद्रकोरीच्या आकारात कापून ते मंद आचेवर तळावं. तळून झालं की पेपरवर काढून ठेवावं. थोडं गार झालं की, मसाला भुरभुरावा व हलक्या हाताने एकत्र करावं.
गुलकंद रवा लाडू
रवा मंद आचेवर तुपात लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा आणि मग गॅस बंद करून थंड करावं. थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर घाला. गुलकंदाची छोटी गोळी करून घ्यायची आणि लाडू वळताना ती गोळी मधोमध ठेवून भोवती लाडू वळून घ्यायचा. अशाप्रकारे गुलकंद रवा लाडू तयार.
पनीर करंजी
पनीर करंजी बनवण्यासाठी पनीर कीसून घ्यावं किंवा त्याचे छोटे तुकडे करावेत. मंद आचेवर हे कीसलेले पनीर गुलाबी होइपर्यंत परतावे. त्यानंतर त्यात पिठीसाखर, वेलची व बारीक कापलेले ड्रायफ्रूटस टाकून एकजीव करून घ्यावं. दुसरीकडे करंजीच्या आवरणासाठी मैदा व गव्हाचं पीठ मळून घ्यावं व त्याचे छोट्या आकाराचे गोळे करून ते लाटून घ्यावेत. पनीरचं सारण त्यात टाकून आवरणाच्या चारही बाजूने पाणी लावावं व दोन्ही कडा जोडून घ्याव्यात. सुरीने किंवा डिझायनर कटरने या आवरणाला हवा तसा आकार द्यावा आणि गरम तेलात ही करंजी तळून घ्यावी.
रोझ खोबरं बटाटा वडी
कढईत तूप घेऊन त्यात एक वाटी साखर, एक वाटी खोबरं आणि अर्धी वाटी उकडलेला बटाटा मंद आचेवर परतून घ्यावा. साखर विरघळून सगळं एकजीव झालं की, मिश्रण गॅसवरून खाली उतरवून त्यात रोझ सिरप घालावं. एक ताटात वड्या थापून त्या चमच्याने योग्य आकारात कापाव्यात. अशाप्रकारे रोझ बटाटा वडी तयार
संकलन- दीपाली बुद्धिवंत, सिद्धी शिंदे, शिवानी नार्वेकर, पूजा कोर्लेकर, हर्षदा सानप
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट