पालकांचा दबाव वाढून अनेक जोडप्यांवर पालकत्व लादलं जातं. मात्र, असं जबरदस्तीचं पालकत्व जोडप्यांना आणि बाळालाही त्रासदायक ठरतंय.
आई किंवा वडील होण्याची स्वतःची मानसिकता नसतानाही अनेकदा पालकांच्या दबावामुळे निर्णय घेतलेल्यांची संख्या जास्त असते. यात एकाच जोडीदाराला पालक होण्याची इच्छा असणं आणि दुसऱ्याचं करिअर किंवा शारीरिक, मानसिक क्षमता ‘चान्स’ घेण्याच्या आड येणं, हीसुद्धा कारणं दिसू लागली आहेत.
पहिल्या दोन-तीन महिन्यांतच मुलाला सतत फीडिंग करणं, नुकत्याच आई झालेल्या तरुणींना जड वाटतं. एक वेळ त्या गरोदरपण निभावून नेतात; पण त्यानंतर रात्री सतत भुकेनं उठणारं बाळ, त्यामुळे सलग झोप न मिळणं, अपुऱ्या झोपेमुळे येणारा थकवा हल्लीच्या तरुणींना नकोसा वाटतो. या सगळ्यातून सुटका म्हणून आणि स्वतःच वाढवलेल्या उच्च जीवनशैलीच्या अपेक्षांमुळे पुन्हा कामाला जाण्याची गरज वाटू लागते. ऑफिस, करिअर, तिथले ताण आणि या सगळ्याचा परिणाम बाळाला दूध पाजण्यावर होतो.
यावर उपाय काय?
प्रसूती होईपर्यंतच त्या आईची काळजी घेता येणं शक्य असतं. नंतर मात्र ते बाळ खरोखरंच पूर्णपणे आईवरच अवलंबून असतं, हे प्रत्येक आईनं स्वीकारूनच ‘आई’ व्हायचंय, की नाही, हे पूर्ण विचारांती ठरवावं, असं सांगत सायकॉलॉजिस्ट व कॉर्पोरेट ट्रेनर दीप्ती पन्हाळकर म्हणाल्या, ‘या कालावधीत नवरा आपल्या आर्थिक गरजा पुरवतोय, तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्या आपणच खंबीर राहायचं, हे प्रत्येक आईनं मनाशी पक्कं ठरवावं. बाहेरची पार्टी किंवा सामाजिक उपक्रम विसरून गेलं, तरच आईपणाचा आनंद मनापासून घेता येईल. बाळालाही एक ‘प्रोजेक्ट’ म्हणून पाहिलं, तर जिथं मदत लागेल, तिथं ती हक्कानं मागून आपल्याकडून जेवढं उत्तम तेवढं बाळाला देता येईल.’
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट