दिवाळी म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाची पर्वणी. अगदी पंधरा-वीस दिवस अगोदरपासून दिवाळीची तयारी सुरु असते. मग सगळ्याच बाबतीत अग्रस्थानी असणारे नेटकरी या उत्सवच्या सेलिब्रेशनमध्ये मागे कसे राहणार? खरंतर दिवाळीच्या कित्येक दिवस अगोदरपासूनच फराळ, साफसफाई, फटाकेबाजी आणि महत्त्वाचे म्हणजे दिवाळीची सुट्टी यावरून सोशल मीडियावर हास्याचे फटाके फुटायला सुरुवात झाली. त्यामुळे सर्वत्र दिवाळी पूर्वीची हास्य दिवाळी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय, असं म्हणायला हरकत नाही. दिवाळीच्या निमित्ताने सोशल मीडियावरील मिम्स पेज अॅक्टीव्ह झालेत. रांगोळीपासून ते पिस्तुली-फटक्यांपर्यंत आणि उटण्यापासून ते फराळापर्यंत सर्वच गोष्टींना नेटकरी कसं काय रिलेट करतील याचा काही भरवसा नाही.
आता पावसाळ्याचे दिवस संपले असूनही पावसाळा सुरु आहेच. ही गोष्ट हेरून पाऊस आणि दिवाळीबद्दलच्या जोक्सना उधाण आलंय. ‘यंदाच्या दिवाळीत पाऊस लावायचा, की फक्त पाहायचा?’ हा जोक सध्या अनेकांच्या फेसबुक आणि व्हॉट्स अॅपचे स्टेटसमध्ये पाहायला मिळतोय. एखाद्या जुन्या पोस्ट्स किंवा ट्विटची यंदाच्या दिवाळीशी कशी काय वात जुळवून सोशल मीडियावर हास्याचा फटाके फुटतील याचा काही नेम लागणार नाही. दिवाळीपूर्वीच्या याच सुखद आठवणी दिवाळीनंतरही सोशल मीडियावर रेंगाळत राहतात. अशा दिवाळीची धुमधाम नेहमी लोकांच्या मनात रहावी म्हणूनच का होईना नेटकरी नेहमीच तत्पर असतात.
तरुणाई केवळ फन अँड फाइन म्हणत दिवाळी सेलिब्रेट करत नाही तर दिवाळीदरम्यान होणारं प्रदूषण लक्षात घेऊन ते टाळण्यासाठी फेसबुकवरील अनेक जागरूक पेजेसनी नेटकरांना आवाहन केल्याचं दिसतं. #इकोफ्रेंडली_दिवाळी (#EcoFriendly_Diwali), #रांगोळी (नॅचरल-ऑरगॅनिक), #से_नो_टू_क्रॅकर्स (SayNoToCracker) आदी हॅशटॅगनी अशा प्रकारचं आवाहन केलं गेलं. कंदील, पणत्या, रांगोळ्यांचे रंग अशा प्रकारच्या वस्तूंत पर्यावरणस्नेही घटकांचा वापर करा, असं सांगितलं जातंय. ट्विटरवरही फटाक्यांच्या आवाजानं घाबरलेल्या किंवा जखमी झालेल्या प्राणी-पक्ष्यांची काळजी कशी घ्यावी, हे सांगितलं जातंय. विविध सामाजिक संस्थांनी अनाथालयं, वृद्धाश्रम, गरजू लोकांना मदत करून आपल्या दिवाळीच्या आनंदात त्यांनाही सहभागी कसं करून घेता येईल, असं आवाहन केलंय. त्यामुळे सध्या #शेअरजॉय (ShareJoy) हा हॅशटॅगही चर्चेत आहे.
व्हायरल झालेले काही जोक्स:
लहानपणी मी दिवाळीला पाऊस लावायचे
आता पाऊस माझ्या दिवाळीची वाट लावतोय
दिवाळीचा फराळ बनवताना बायकोला मदत केल्याचे फोटो फेसबुकवर टाकून दुसऱ्यांच्या सुखी आयुष्याचा खेळ करू नये, ही विनंती.
यावर्षी चिवडा, चकली, शंकरपाळे, अनारसे, चिरोटे, करंजी यापैकी कुठलाही पदार्थ खुसखुशीत न होता मऊ झाला तर
.
.
.
बिनधास्त पावसाळी हवेच्या नावावर द्या खपवून.
सगळ्याचा दोष कायम नेतेमंडळींच्या माथी मारला पाहिजे असं काही नाही!
संकलन- अजय उभारे, सन्मेश संखे, करण मेश्राम
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट