गंमत म्हणजे त्याकाळी नेव्हीचा तो गणवेश फक्त भाड्यानं मिळायचे. काही केल्या आठ वर्षांच्या मुलाचे कपडे मिळत नव्हते. अखेर आई-बाबांनी एक दुकान शोधलं. तिथं खरं तर खऱ्याखुऱ्या नौदल अधिकाऱ्यांचे कपडे शिवून मिळायचे. अखेर आई-बाबांनी त्या दुकानदाराला माझ्यासाठी तसा युनिफॉर्म शिवून देण्यासाठी कसंबसं तयार केलं. त्यानंही आनंदानं माझा बालहट्ट पुरवला. अखेर माझ्या वाढदिवशी गिरगावातल्या आमच्या चाळीतली माझी सगळी मित्र मंडळी एकत्र जमली. मुलं-मुली फ्रॉक आणि शर्ट-पॅन्टमध्ये होते. केक कापण्याची वेळ जवळ आली आणि मग ऐटीत माझी एंट्री झाली. पांढरे शर्ट-पॅन्ट, कॅप, बेल्ट, मेडल, बूट अशा नेव्हीच्या युनिफॉर्ममध्ये मी आलो, केक कापला. अशा प्रकारे माझा वाढदिवस साजरा झाला. ‘उस युनिफॉर्म की बात ही कुछ और है!’ मला त्या गणवेशाबद्दल प्रचंड आकर्षण होतं. केवळ नौदलच नाही, तर देशासाठी प्राणांची बाजी लावणारे लष्करातले जवान, पोलिस, अग्निशमन दलाचे जवान अशा सर्वांबद्दलच मला नितांत आदर आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट