भिन्न संस्कृतीमधील मुलगा-मुलगी प्रेमात पडतात, लग्न करण्याचं ठरवतात. अर्थात आई-वडिलांचा आशीर्वाद मिळावा यासाठी दोन्ही कुटुंब पहिल्यांदाच एकत्र येतात. तीन दिवसांच्या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये असा काही गोंधळ उडतो की वधू-वर लग्नाचाच पुनर्विचार करायला लागतात. अशी ही रंजक कथा आहे, यशराजच्या वाय फिल्म्समधील 'बँग बाजा बारात' या वेब सीरिजची.
ही भव्य सीरिज एखाद्या सिनेमासारखी भासते. लोकेशन्स, वेशभूषा, रंगभूषा-केशभूषा सगळ्या गोष्टी बघता बॉलिवूडपटाला टक्कर देईल, असा विचार एकदा तरी मनात डोकवतोच. यात नाच-गाणं असा मनोरंजनाचा मसाला आहेच, पण विशेष म्हणजे याचं कथानकही खुसखुशीत डायलॉग्ससह उत्तम लिहिलं गेलंय. अली फजल आणि अंगिरा धर यांनी अभिनय कौशल्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. गंभीर प्रसंगीसुद्धा योग्य ठिकाणी हास्याचा डोस पेरला गेलाय.
शहरातील लोकांचे समकालीन विचार यात मांडण्यात आले आहेत. यात अगदी डेटिंग अॅप्सपासून बॅचलर्स पार्टीपर्यंत अनेक गोष्टी आहेत. मुळात नवीन नात्यांवर भाष्य करणारी अशी ही वेब सीरिज आहे. आजच्या तरुणाईला जोडीदाराकडून काय हवंय? तर पालकांच्या काय अपेक्षा आहेत? हे गंमतीशीर पद्धतीनं दाखवण्यात आलंय. काही प्रमाणात ही सीरिज बोल्डही म्हणता येईल. सीरिजमधील सगळीच पात्र एकाहून एक भन्नाट आहेत. यात टिपिकल भारतीय संस्कृतीची चौकट मोडणाऱ्या काही गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. मात्र यातून काळ कसा बदलतोय हे समजून घ्यायला हवं. पुढच्यावर्षी याचा पुढचा सीझन येत असल्यानं मी अधिकच उत्सुक आहे.
बँग बाजा बारात
कलाकार : अली फजल, अंगिरा धर
एपिसोड्स : ५
युट्यूब चॅनेल : वाय फिल्म्स
दिग्दर्शक : आनंद तिवारी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट