Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

​ नव्यांसाठी आणतोय संधी

$
0
0

आदित्य बिवलकर

लाइव्ह कार्यक्रम आणि ऑर्केस्ट्राची सगळीकडे चलती आहे. त्यातून अनेक तरुण, हरहुन्नरी कलाकारांना संधी मिळत असते. एक डोंबिवलीकर तरुण मात्र इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करतोय. हा अवलिया संगीतकार आहे प्रणव हरिदास. आपल्या पीआर क्रिएशन्स या संस्थेच्या माध्यमातून नवीन कलाकार आणि युवकांना लोकांसमोर आणण्यासाठी त्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर नवनवीन प्रकारच्या संगीताचा प्रसार करण्याचा त्याचा प्रयत्न आहे.
प्रणव मूळचा इचलकरंजीचा. त्यानं लहानपणीच संगीतामध्ये करिअर करायचं निश्चित केलं होतं. त्यानंतर त्यानं आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मुंबई गाठली. इथे आल्यापासूनच मेहनत घेऊन तो संगीतामध्ये वेगवेगळे प्रयोग करतोय. संगीत संयोजन, नियोजन तसंच संगीतकार म्हणून तो काम करतोय. २०१४मध्ये रुपारेल कॉलेजसाठी इंडियन ग्रुप साँग करण्याची संधी त्याला मिळाली. त्याचबरोबर त्यांनी युवा कलाकारांना व्यासपीठ मिळवून देत आकाशवाणीसाठी २५ गाणी संगीतबद्ध केली आहेत.
सध्या पीआर क्रिएशन्सच्या फेसबुक चॅनलद्वारे तो नवीन कलाकारांना व्यासपीठ देऊन नवीन गाण्यांची निर्मिती करत आहे. याचबरोबर सध्या वेगवेगळ्या नवीन प्रोजेक्ट्सवर काम सुरू असून अधिकाधिक नवीन कलाकारांना संधी देण्याचा प्रयत्न असल्याचं प्रणव सांगतो. सह्याद्री गीत या गाण्यातून १४ युवा कलाकारांना संधी देण्यात आली होती. इथपर्यंत पोहोचण्यासाठी घरच्यांची तसंच आजवर सोबत काम केलेल्या सर्व कलाकारांची साथ मिळाली असं प्रणव सांगतो.
रेकॉर्डिंगच्या वेळी गाणं अधिकाधिक चांगलं व्हावं आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं असा प्रणवचा प्रयत्न असतो. यासाठी गरज पडल्यास स्वतः पदरमोड करण्याचीसुद्धा त्याची तयारी असते. कोणत्याही परिस्थितीमध्ये गाणं चांगलं करण्यासाठी प्रणव मेहनत घेत असतो. यासाठी नवीन कलाकारांसोबतच चांगले वादक आणि कलाकार यांची साथ त्याला मिळालेली आहे.

‌दिग्गजांसोबत बासरीवादन
एकीकडे नवीन कलाकारांना व्यासपीठ देताना प्रणव स्वतः सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून चमकतोय. एक उत्तम बासरीवादक अशी त्याची ओळख तयार होत असून रविंद्र साठे, श्रीधर फडके यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यानं बासरीवादन केलं आहे. याचबरोबर तालवाद्यांचंही मूलभूत शिक्षण त्यानं घेतलं आहे.
वेगवेगळ्या कार्यक्रमांतून वादन करत असताना नवीन गाण्यांचा कार्यक्रम करण्याची त्याची इच्छा आहे. लोकांसमोर नवीन गाणी यावीत, लोकांना वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकायला मिळावं आणि त्यातून नवनिर्मितीला वाव मिळावा अशी त्याची इच्छा आहे. यासाठी लोकांसमोर पूर्ण नवीन गाण्यांचा आणि रचनांचा कार्यक्रम घेऊन यावा असा त्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles