वैवाहिक नातं जपताना बांधिलकीबरोबर एकमेकांना मोकळीकही तितकीच महत्त्वाची ठरते. मोकळीक म्हणजे नात्याची प्राथमिक चौकट पाळत स्वतःसाठी म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य. हीच मोकळीक सध्या ‘स्पेस’ या नावानं रूढ असून, यासाठी होणाऱ्या टोकाच्या आग्रहापोटी वैवाहिक नात्यामध्ये वादाला ठिणगी पडते आहे. हा वाद घटस्फोटापर्यंत पोहोचत असून, महिन्याला एकूण केसच्या ४० टक्के ‘स्पेस’ हे घटस्फोटाचं मूळ कारण सांगणाऱ्या असल्याचं मॅरेज कौन्सेलरचं निरीक्षण आहे.
सध्या स्पेस हा वादाचा मुद्दा ठरतो आहे. ३० ते ५० वयोगटामध्ये यामुळे वाद घटस्फोटापर्यंत पोहोचत आहे. सुशिक्षित नोकरदार आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी वर्गाचं प्रमाण यामध्ये जास्त असल्याचं मॅरेज कौन्सेलर स्मिता जोशी यांनी ‘पुणे टाइम्स’ला सांगितलं. त्या म्हणतात, ‘तडजोडीची तयारी सहसा तयारी दाखवली जात नाही. नात्यामध्ये विश्वास निर्माण करून स्पेस मिळते. ती मागावी लागत नाही. स्पेस मिळवताना जोडीदाराला काय आवडेल, काय नाही याचा विचार करता स्वतःच्या आनंदाला मध्यवर्ती ठेऊन स्पेस मिळवली जाते. स्पेससाठी टोकाची भूमिका घेणं फायद्याचं नसतं. यामुळे नातेसंबंध ताणले जातात. स्पेस नक्कीच मिळायला हवी; पण त्यामध्ये मर्यादा असावी.’
नात्यातली जबाबदारी आणि कर्तव्यं सांभाळून ही स्पेस मिळवली, तर खटके उडत नाहीत. लग्नाआधी स्वतःच्या आनंदासाठी करत असलेल्या गोष्टी लग्नानंतर सोडून देण्याची तयारी नसते. खरंतर त्यातच वैवाहिक नात्याचं हित दडलेलं असतं, हे लक्षात येत नाही आणि याचा अर्थ नात्यात माझी घुसमट होत आहे असा घेतला जाऊ नये, असंही समुपदेशक आवर्जून नमूद करतात. स्पेसचा अतिरेक म्हणजे नेमकं काय हे खालील काही उदाहरणांवरून स्पष्ट होईल.
नेहा आणि राजीवचं सहा महिन्यांचं लग्न. अॅरेंज मॅरेज. अशा लग्नात नवरा-बायको म्हणून नातं फुलायला तुलनेनं जास्त कालावधी लागतो. दोघंही उच्चशिक्षित. लग्नापूर्वी नेहा नाइटआउट पार्टी, स्लिपओव्हर असं आयुष्य जगत होती. सोशल ड्रिकिंगचीही तिला सवय होती. लग्नानंतरही हे कायम असावं म्हणून ती झटायची. जाताना राजीवला काय सांगायचं असा तिचा प्रश्न असायचा. राजीवला मित्रांसोबत नाइटआउट खटकायचं. एकदा-दोनदा त्यानं तिला टोकलंही; पण तू मला माझी स्पेस देत नाही असं म्हणत नेहानं चिडचिड केली. कालांतरानं दोघांची ही चिडचिड चांगलीच वाढली आणि वाद घटस्फोटापर्यंत पोहोचला. नेहाला मला बंधनात ठेवायचं नाही; पण लग्न झाल्यानंतर बायको म्हणून पाळाव्या लागणाऱ्या प्राथमिक गोष्टी तिला मान्य नव्हत्या, असं राजीवचं मत रास्तच होतं.
आणखी एक उदाहरण...
सीमा निखिलबाबत फारच पझेसिव्ह. कुणाला भेटायचं, काय शॉपिंग करायचं, काय घालायचं, आई-बाबांना फोन करायचा का नाही, हे सगळं सीमाच ठरवायची. त्याला स्वतःसाठी म्हणून मुक्त जगायला मिळत नव्हतं. सतत सीमाची देखरेख.
ही घुसमट निखिलच्या वेळीच लक्षात आली आणि त्यानं ब्रेकअप केलं.
वर उदाहरणांमध्ये फरक म्हणजे नेहा स्पेसचा अतिरेक करत होती आणि निखिलची ती गरज होती. हा फरक ओळखला, की नातेसंबंधात क्लिष्टता येत नसल्याचं समुपदेशक सांगतात. ‘हवं ते करायला मिळावं म्हणजे स्पेस असा अर्थ घेतला जात आहे. मग त्यातून निर्माण होणारी बिकट परिस्थिती हाताळता आली नाही, तर माझी स्पेस असं कारण सांगत वेळ निभावून न्यायची वृत्ती अनेकांमध्ये दिसते. नात्यात स्पेस हवीच; पण ती मिळवताना त्यासाठी लबाडी करू नये,’ असं कौन्सेलर, सायकोथेरपिस्ट आणि लाइफकोच डॉ. मकरंद ठोंबरे यांनी सांगितलं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट