माणसाचं आयुष्य इतकं गुंतागुंतीचं होऊ लागलं आहे, की स्वत:कडे लक्ष देण्यास वेळ नसतो. पुरुष स्वत:साठी कसाही वेळ काढतो; पण स्त्रीला ते कठीण जातं. सततच्या कामांचा इतका व्याप असतो, की प्रसंगी दोन मिनिटांचा वेळ मिळणंही कठीण जातं. नोकरी आणि घर अशी स्त्रीची दुहेरी कसरत होत असेल, तर गुंतागुंत अधिकच वाढते. यातून अन्यविध समस्या निर्माण होऊ लागतात. साधी चिडचिडही मोठं रूप घेते.
प्रत्येक गोष्टीसाठी औषध घेणं चांगलं नाही. वारंवार औषध घेणं खरंतर टाळायलाच हवं. मात्र, अन्य काही उपाय अमलात आणले, की आराम मिळू शकतो. स्वत:मध्ये सकारात्मक ऊर्जा पेरली जाऊ शकते. छानसं संथ संगीत आणि नियमित रडणं हे दोन्ही अशाच काही उपायांपैकी प्रभावी उपाय आहेत. या उपायांचा थेट मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. बळ मिळतं. जगण्याची ऊर्मी मिळते.
रात्री झोप येत नसेल, तर मंद आवाजात संगीत ऐका. तुम्हाला झोप येईल. संगीत मांसपेशींसाठी आरामदायी ठरतं. त्यामुळे मनाला तजेला मिळतो. विचार करण्याची शक्ती वाढते. इतकंच नाही, तर तुम्हाला कोणता आजार असेल, तर त्यापासूनही दिलासा मिळू लागतो. दररोज २० ते ३० मिनिटं संगीतात रमल्यास एकटेपणा आणि त्यानुषंगानं येणारा ताण दूर होतो. त्यामुळेच आजकाल रुग्णालयांमध्येही संगीताची मदत घेतली जाते. नियमित संगीत ऐकणाऱ्या रुग्णांची प्रकृती इतर रुग्णांच्या तुलनेत लवकर बरी झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. संगीत तणाव दूर करतं; तसंच मनाच्या आणि शरीराच्या वेदना कमी करतं. संगीत हे कोर्टीसोल हार्मोनचं प्रमाण कमी करून तणावग्रस्त मांसपेशींना आराम देतं. त्यामुळे आधीच्या तुलनेत माणूस अधिक आशावादी आणि सकारात्मकता अनुभवू लागतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट