त्यांच्या कुटुंबातली ही चौकडी प्रत्येक पाहुण्याला लळा लावते. यातला कुणी कधी शेपूट हलवून तुमचं स्वागत करतो, तर कधी अंगांचं मुटकुळं करून तुमच्या कुशीत शिरतो. अभिनेता सौरभ गोखले आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुजा-साठे गोखले यांच्या कुटुंबातले हे सदस्य आहेत, तिबेटिअन ल्हासा आप्सो जमातीची मफिन आणि मायलो, मिनियन आणि विमझी ही तिची पिल्लं….खरंय, अगदी जुळं-तिळं यांच्याप्रमाणेच या चार कुत्र्यांची काळजी सौरभ आणि अनुजा अगदी प्रेमाने घेत असतात.
अनुजाला सरप्राईज भेट म्हणून खरंतर सौरभने मफिनला प्रथम घरी आणलं आणि बघता बघता तिने त्यांचं आयुष्य व्यापून टाकलं. सौरभ सांगतो की, " मला आणि अनुजाला पाळीव प्राण्यांचा खूप सोस आहे. माझ्या घरी पूर्वीही काही गावठी कुत्री होती, मात्र अनुजाला ही आवड जपता आली नव्हती. एकदा आम्ही जेवायला बाहेर गेलो असताना योगायोगाने समोर तिला दोन गोंडस पिल्लं दिसली. आपल्याकडेही असा कुत्रा हवा, असं ती बोलून गेली. माझ्या ते डोक्यात राहिलं. मी मित्र अमोल बावडेकरला ते बोलून गेलो आणि एक दिवस खरोखरच अमोलने 'राधा ही बावरी'च्या सेटवर एक गोड पिल्लू आणलं आणि मला दिलं. हीच आमची मफिन. त्यानंतर अनुजाला जेव्हा मी ही गोजिरवाणी भेट दिली, तेव्हा तिच्या आनंदाला पारावारच उरला नाही. "
गेल्या वर्षी या मफिनने पाच पिल्लांना जन्म दिला. त्यातली दोन पिल्लं दत्तक म्हणून मित्रांना दिल्यावर आता गोखले कुटुंबात कुत्र्यांची ही चौकडी आहे. सौरभ-अनुजाला शूटिंगसाठी बाहेर रहावं लागतं. त्यावेळी हे चौघेही घरात व्यवस्थितपणे एकटे राहतात. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली की ते आपसातच खेळतात आणि सौरभ-अनुजा घरी आले की, त्यांच्या अंगाखांद्यावर बागडत त्यांचं स्वागत करतात. अभिनयक्षेत्रातली बरीच मंडळी केवळ या ल्हासा आप्सोंशी खेळायला त्यांच्या घरी येतात. त्यांच्याशी मस्ती करतात. त्यांना फिरायला घेऊन जातात. मफिनला त्यांचं पुण्याचं घर अधिक आवडतं. सौरभ-अनुजाच्या आईवडिलांशीही त्यांची छानच गट्टी आहे.
पुण्याहून मुंबईत येताना एक्स्प्रेसवे सोडून मुंबईचं घर कधी येणार, हे त्यांना पक्कं ठाऊक आहे आणि घर जवळ येताच त्यांची चुळबूळ सुरू होते. मफिन तर सौरभच्या मांडीवर ड्रायव्हर सीटवर बसूनच प्रवास करते. "जीव लावणं म्हणजे काय, हे आम्हाला मफिनने शिकवलं. कुत्र्यांना भीत असलेल्या अनेकांना तिने तिच्यावर प्रेम करण्यास प्रवृत्त केलंय. ती गरोदर असताना आम्ही दोघांनीही तिच्यासाठी सुट्टी घेतली आणि तिची डिलिव्हरीही आम्ही दोघांनी केली. त्यातून आमच्यात निर्माण झालेले ऋणानुबंध अलौकिक आहेत. ज्या आतुरतेने ही मंडळी आमची वाट बघतात, ते सारे ताण विसरायला लावणारे असते. माझी आजी आजारी असताना ही चौघं फक्त तिच्याजवळ जाऊन बसत असत. दंगा, मस्ती, गोंधळ अजिबात करत नसत. माणसांनाही नसेल एवढी समज त्यांना आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट